The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २१ : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील ११३ बटालियन सीआरपीएफ कॅम्प मध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे नेतृत्व कमान्डेंट जसवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी प्रारंभी सर्व अधिकारी, जवान तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या व नियमित योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमात योगाभ्यासाद्वारे शरीर, मन आणि आत्मा यांचे संतुलन राखण्याचे तत्त्व विशद करण्यात आले. धावपळीच्या जीवनात निर्माण होणाऱ्या ताणतणाव, थकवा व मानसिक अस्वस्थतेवर योग हे प्रभावी उपाय आहे, यावर विशेष भर देण्यात आला. नियमित योग केल्यास औषधांशिवायही आरोग्य सुधारते, हे उदाहरणासहित सांगण्यात आले.
जसवीर सिंग यांनी आपल्या भाषणात भारतीय योग परंपरेचे जागतिक महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात मांडलेला प्रस्ताव आणि त्याला मिळालेला जागतिक प्रतिसाद यामुळे २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो, याची आठवणही यावेळी करून देण्यात आली.
कार्यक्रमात उपकमान्डेंट रामकिशन, गुलाब सिंग, सहायक कमान्डेंट बाबू सिंग, अधिनस्त अधिकारी, जवान व त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. योगासनांचे सादरीकरण शिस्तबद्ध व प्रेरणादायी ठरले.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #yogaday #yoga_day