गडचिरोलीत अवैध देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त : ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी ताब्यात

1075

The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : गडचिरोली पोलीसांनी ताडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुडकेली जंगल परिसरात दोन दिवसांपूर्वी सुरु करण्यात आलेला अवैध बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करत तब्बल 39.31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, इतर फरारी आरोपींचा शोध सुरु आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार आणि प्रभारी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, विशेष अभियान पथक व प्राणहिता पथक यांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली. 14 मे रोजी गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगल परिसरात छापा टाकला असता, आरोपींनी अंधाराचा आणि जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक चारचाकी वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. संपूर्ण रात्री घटनास्थळ सुरक्षीत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पंचासमक्ष कारवाई करत लाखो रुपयांची बनावट दारू, स्पिरीट, वाहने, सिलींग मशिन्स, जनरेटर, विविध साहित्य व रसायने असा एकूण 39.31 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घटनास्थळावरून वसंत पावरा (रा. बोराडी), शिवदास पावरा (रा. धाबापाडा), अर्जुन अहिरे (रा. धुळे) आणि रविंद्र पावरा (रा. सलाईपाडा) यांना ताब्यात घेण्यात आले असून ताडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. भगतसिंग दुलत करत आहेत.
ही कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गडचिरोली पोलिसांच्या या तडाखेबंद कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here