The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. ०७ : धानोरा तालुक्यातील रांगी परिसरात जिओ कंपनीची मोबाईल आणि इंटरनेट सेवा गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होत असून, 4G-5Gच्या नावाखाली ग्राहकांना कधी 2G तर कधी एकदमच ‘नो नेटवर्क’चा सामना करावा लागत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
रांगी व आसपासच्या सुमारे १५ ते २० गावांचा संपर्क याच टॉवरवर अवलंबून आहे. सुरुवातीला चांगली सेवा देऊन जिओने ग्राहकांना आकर्षित केलं, मात्र आता सेवा ढासळल्याने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.
“महिन्याला वेळेवर रिचार्ज करायचं, पण सेवा मात्र अर्धवट मिळते. ही सरळसरळ फसवणूकच!” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली आहे. अनेकदा कॉल ड्रॉप, इंटरनेट बंद, किंवा फार कमी स्पीड अशा तक्रारी सतत समोर येत आहेत.
जिओने येथे दोन ते तीन वर्षांपूर्वी टॉवर उभारले असून, कर्मचारी आणि कार्यालय अस्तित्वात असतानाही सेवा का बिघडत आहे, हा मोठा प्रश्न बनला आहे. परिसरातील नागरिकांनी जिओ व संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ सुधारणा करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ग्रामीण भागातील लोकांपर्यंत दर्जेदार संवाद सेवा पोहोचवणे हीच खऱ्या अर्थाने ‘डिजिटल इंडिया’ची मूलतत्त्वे आहेत, हे जिओने लक्षात घ्यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

#JioNetworkDown #RangiGrievance #MobileServiceIssue #Jio4GProblem #CustomerTrouble #GadchiroliNews
#DigitalIndiaReality #NetworkFailure #JioComplaint
#धानोरा_बातमी #ग्रामीण_नेटवर्क_समस्या #जिओची_सेवा_कोसळली