नगराध्यक्ष व्हायचंय! पण गडचिरोलीच्या गल्लीबोळांची माहिती आहे का खरंच?
The गडविश्व
गडचिरोली/ विशेष प्रतिनिधी, दि. १२ : आगामी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून शहरातील गल्लीबोळांपासून राजकीय गोट्यांपर्यंत चर्चा तापली आहे. अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी अनेक पक्षांकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. काही इच्छुक उमेदवार घराघरांत जाऊन मतदारांना गाठत आहेत, तर काही अजूनही पक्षाच्या हिरव्या कंदिलाची वाट पाहत आहेत.
मात्र या सगळ्या राजकीय हालचालींच्या दरम्यान शहरात एकच प्रश्न गाजू लागला आहे – “नगराध्यक्ष व्हायचंय म्हणणाऱ्यांना खरंच शहराच्या गल्लीबोळांची, समस्यांची आणि नागरिकांच्या वेदनांची माहिती आहे का?”
गडचिरोली नगर परिषद क्षेत्रातील अनेक प्रभागांमध्ये आजही रस्त्यांची दयनीय अवस्था, अतिक्रमणामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, नाल्यांची दुर्दशा, सांडपाणी समस्या, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आणि कचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणा असे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. नागरिकांना दररोज या समस्यांना सामोरे जावे लागत असताना, मतांच्या हव्यासात उमेदवार घराघरांत हजेरी लावत आहेत.
‘जे आज मतांसाठी आमच्या दारात येतात, ते निवडून आल्यावर आमच्याच दाराची पायरी चढतील का?’ असा थेट आणि स्पष्ट सवाल नागरिकांचा आहे.
अनेक उमेदवार निवडणुकीच्या प्रचारात शहराच्या विकासाचा नारा देतात, परंतु प्रत्यक्षात शहरातील समस्या ओळखणारे व त्या सोडविण्याची बांधिलकी दाखविणारे नेतृत्व अद्याप दिसत नाही. काही उमेदवारांना स्वतःच्या प्रभागाबाहेरील भागांची नावेही माहित नसल्याची चर्चा नागरिकांत आहे. तर काही सामाजिक संघटना आणि जागरूक नागरिक आता मतदारांना आवाहन करत आहेत की, ‘ फक्त पक्षाचे चिन्ह पाहून नव्हे, तर उमेदवाराला शहराच्या प्रत्येक गल्लीतील वास्तवाची माहिती आहे का, हे पाहून मतदान करा. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारापुढे मोठे आव्हान आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ निधी किंवा घोषणांनी होत नाही फक्त आश्वासनं नव्हे, तर कृतीशील नेतृत्वाची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे. गडचिरोलीच्या अडचणी समजून घेणारा, शहराच्या विकासाची दिशा ठरवणारा आणि प्रशासनाशी समन्वय साधणारा उमेदवारच खरी बदलाची ओळख ठरू शकतो, अशी भावना शहरात व्यक्त होत आहे.
नगर परिषद निवडणुकीचे रणांगण आता तापले असून, पक्षीय समीकरणे बदलत आहेत.गडचिरोलीच्या गल्लीबोळांचा ठाव घेणारा नगराध्यक्ष पुढे येतो का, की फक्त निवडणूक संपेपर्यंतच शहराची आठवण ठेवणारे नेते पुन्हा रंगमंचावर येतात? आता एवढेच पाहायचं आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #GadchiroliElection #MunicipalPolls #MayorCandidate #CityDevelopment #LocalIssues #CivicPolls #GadchiroliNews #Election2025 #PoliticalAwareness #VoterVoice #CityProblems #UrbanGovernance #CivicLeadership #GrassrootPolitics #PublicAccountability #ElectionUpdates #MaharashtraPolitics #VoterAwareness #CleanCityMission #SmartGovernance














