गडचिरोलीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत दोघे सख्खे भाऊ ठार
– खड्ड्यांमुळे झाला अपघात
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : शहरातील आरमोरी मार्गावरील प्लॅटिनम स्कूल जवळील दर्गा समोर आज दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास ट्रकने दुचाकीस धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात गडचिरोली येथील दोघे सख्खे भाऊ ठार झाल्याची घटना घडली. पुरुषोत्तम बाबूराव बारसागडे (वय ४०), रा आणि अंकुश बाबुराव बारसागडे (वय ३५) रा. सुभाष वार्ड, गडचिरोली असे अपघातात ठार झालेल्यांची नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पुरुषोत्तम व अंकुश बारसागडे हे दोघे भाऊ एमएच ३३ आर ७७८९ क्रमांकाच्या दुचाकीने शेतातून आरमोरी रोड मार्गे गडचिरोली कडे घरी जात होते. दरम्यान, गडचिरोली शहरातून आरमोरी कडे जाणाऱ्या एमएच ३४ बीजी ८६५७ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने दुचाकीस समोरून जबर धडक दिली. या घटनेत दोघेही भाऊ जागीच ठार झाले.
त्यांच्या अपघाती निधनाने बारसागडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पुरुषोत्तम यांना एक मुलगा व मुलगी आहेत तर अंकुश यांना एक मुलगा आहे अशी माहिती आहे. महेश माणिक पुरी (वय ३२, रा. चंद्रपूर) असे ट्रकचालकाचे नाव असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते. पुढे तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.
स्थानिक सूत्रांनुसार, हा अपघात रस्त्यावरील खड्डे टाळताना झाला असल्याचे समजते. आरमोरी मार्ग खड्ड्यांनी जर्जर झाला आज. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रात्रीच्या सुमारास या खड्ड्यांचा अंदाजही समजून येत नाही. खड्ड्यांची दुरवस्था नागरिकांसाठी दररोज जिवघेणी धोकादायक ठरतआहे. जिल्हाधिकारी यांनी काही दिवसांपूर्वीच फर्मान काढला होता की, खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित विभाग दोषी ठरवला जाईल, त्यामुळे या प्रकरणात जबाबदारी कोणावर येणार हे लक्षवेधक ठरणार आहे.
आरमोरी मार्ग नागरिकांच्या जीवावर उठला , ठीकठिकाणी खड्डे
इंदिरा गांधी चौकापासून आरमोरी मार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून हा मार्ग खड्ड्यांनी जर्जर झाला आहे. प्रशासन सामान्य नागरिकांची सुरक्षा दुर्लक्षित करत आहे. मोठे पुढारी वा मंत्री आले त्याच दरम्यान या मार्गाची डागडुजी होते आणि सामान्य लोकांची सुरक्षा मात्र दुर्लक्षित राहते.
एकीकडे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याला स्टील हब म्हणून विकसित करण्याचे घोषवाक्य देतात, मात्र जिल्हा मुख्यालयाचा हा ढासळलेला रस्ता सामान्य नागरिकांसाठी धोकादायक आहे. नागरिकांनी भावना व्यक्त करताना असेही म्हटले जात आहे की, पालकमंत्री फक्त हवाई दौऱ्यांवर येतात; कधी प्रत्यक्ष रस्ता तपासण्यासाठी येतील, हे पाहणे आवश्यक आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #breakingnews #latestnews #accident














