राष्ट्रसंत विचारांच्या प्रसाराला सन्मान ; उदय धकाते यांना श्रीगुरुदेव पत्रकारिता पुरस्कार
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : निष्ठावान पत्रकारिता, समाजप्रबोधन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा सातत्याने प्रभावी प्रचार-प्रसार केल्याबद्दल गडचिरोली येथील पत्रकार उदय बळीरामजी धकाते यांना तेलंगणा राज्यातील गोयेगाव (मंडल-केरामेरी, जि. आसिफाबाद) येथे आयोजित समारंभात ‘श्रीगुरुदेव पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
दिवंगत पुरुषोत्तम हिरादेवे स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद, केंद्रीय समिती, चंद्रपूर (महाराष्ट्र) यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पत्रकार उदय धकाते यांनी पत्रकारिता व समाजप्रबोधनाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. “ग्रामगिता घरोघरी” हा उपक्रम त्यांनी “महाभारत न्यूज” या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून राबवून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या अमृतवाणीतील प्रवचने अनेक भागांतून थेट जनतेपर्यंत पोहोचविली. तसेच श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या विविध उपक्रमांचे सातत्याने वृत्तांकन करून राष्ट्रसंतांच्या विचारांना व्यापक व्यासपीठ मिळवून दिले.
मागील वर्षी गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर आधारित भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समाजप्रबोधन आणि वैचारिक जागृतीसाठी केलेल्या या उपक्रमांची दखल घेत परिषदेकडून उदय धकाते यांचा गौरव करण्यात आला.
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने आयोजित २० वे आंतरराज्य राष्ट्रसंत साहित्य संमेलन तेलंगणा राज्यातील गोयेगाव येथे पार पडले. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक ॲड. पारोमिता गोस्वामी, उद्घाटक आमदार कोवा लक्ष्मी, श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख ग्राम. गोपाल कडू, ज्येष्ठ साहित्यिक ग्राम. बंडोपंत बोढेकर, ॲड. सारिका जेनेकर, श्रीकांत धोटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उदय धकाते यांना रोख रक्कम, मानवस्र, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व ग्रामगिता प्रदान करून कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला.
१९९५ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले उदय धकाते यांनी गडचिरोली पत्रिका मधून पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर चंद्रपूर समाचार, लोकसत्ता व लोकमत या नामांकित वृत्तपत्रांतून त्यांनी कार्य केले आहे. सध्या ते सोशल मीडियावरील “महाभारत न्यूज” पोर्टलचे संपादक असून या पोर्टलला आतापर्यंत आठ कोटींहून अधिक वाचकांनी भेट दिली असल्याची नोंद आहे.
याप्रसंगी परिषदेचे सरचिटणीस ॲड. राजेंद्र जेनेकर, गडचिरोली पत्रिकाचे संपादक केशवराव दशमुखे, पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर, अद्वैत चव्हाण, धर्मा गावंडे, अंजली भांडेकर, साक्षी भांडेकर व चेतन भजभुजे आदींनी उदय धकाते यांचे अभिनंदन केले.
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेने उदय धकाते यांच्या हातून यापुढेही राष्ट्रसंतांच्या विचारांवर आधारित जनकल्याणकारी कार्य घडत राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














