गडचिरोलीसाठी ऐतिहासिक पर्व : जिल्ह्यात होणार स्वतंत्र पोस्टल डिव्हिजन व हेड पोस्ट ऑफिस
– खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रयत्नांना यश
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : गडचिरोली जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक आणि मैलाचा दगड ठरणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, येथे पोस्ट विभागाचे स्वतंत्र विभागीय कार्यालय आणि हेड पोस्ट ऑफिस स्थापन होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सातत्याने केंद्र स्तरावर पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे.
गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झाल्याला ४२ वर्षे पूर्ण झाली असली तरी, आजतागायत येथे ना स्वतंत्र हेड पोस्ट ऑफिस होते ना पोस्टल डिव्हिजन. परिणामी, जिल्ह्यातील नागरिकांना टपाल व्यवहार, बचत खाती, टपाल विमा आणि केंद्र शासनाच्या योजनांसाठी चंद्रपूरपर्यंत प्रवास करावा लागत होता. या सेवांचा लाभ घेणे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी कष्टदायक आणि खर्चिक ठरत होते.
या पार्श्वभूमीवर, केंद्र शासनाच्या संप्रेषण मंत्रालयाच्या टपाल संचालनालयाने महाराष्ट्र सर्कलच्या प्रस्तावास सैद्धांतिक मान्यता दिली आहे. याअंतर्गत गडचिरोली एमडीजी (HSG-I) चे रूपांतर हेड पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात येणार असून, विद्यमान चंद्रपूर पोस्टल डिव्हिजनचे विभाजन करून स्वतंत्र गडचिरोली पोस्टल डिव्हिजन तयार होणार आहे.
या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातच सर्व प्रकारच्या टपाल सेवा, बँकिंग सुविधा, खात्यांचे व्यवस्थापन आणि योजनांचे वितरण उपलब्ध होणार आहे. विशेषतः आदिवासी व दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी हा बदल फार मोठा दिलासा ठरणार आहे. यामुळे टपाल सेवांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढेल, तसेच स्थानिक प्रशासनालाही मोठा आधार मिळेल.
या ऐतिहासिक घडामोडीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार डॉ. किरसान म्हणाले, “गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. आता जिल्ह्याला टपाल क्षेत्रात स्वतंत्र ओळख मिळणार असून नागरिकांना घराजवळच सेवा मिळणार आहेत.”
गडचिरोलीच्या प्रशासनिक आणि सामाजिक प्रगतीत या निर्णयामुळे नवी ऊर्जा संचारेल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे. जिल्ह्याच्या स्वातंत्र्याच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल मानले जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #MPNamdevKirsan #PostalDivision #HeadPostOffice #GadchiroliDevelopment #AdministrativeReform #CentralGovernmentApproval
#गडचिरोली #खासदारनामदेवकिरसान #टपालविभाग #स्वतंत्रपोस्टऑफिस #गडचिरोलीविकास #प्रशासनिकनिर्णय #केंद्रसरकारनिर्णय
