– शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी शासनाकडे भरपाईची मागणी करण्याचे आश्वासन
The गडविश्व
नागभीड, दि. ६ : नागभीड तालुक्यात काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसासह वादळी वारा आणि गारपीट यामुळे उन्हाळी धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तळोधी परिसरातील गंगासागर हेटी, आकापूर, उश्राळमेंढा, वाढोणा आणि इतर गावांतील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत हालाखीची झाली असून, बँकेचे कर्ज घेऊन केलेली धानाची लागवड वाया गेली आहे.
या पार्श्वभूमीवर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आज गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे दुःख ऐकून घेतले आणि “शेतकऱ्यांच्या या नुकसानीकडे सरकारचे लक्ष वेधून नुकसान भरपाईसाठी तातडीने पाठपुरावा केला जाईल,” अशी ग्वाही दिली.
“शेतकऱ्यांचा घास ऐन तोंडाशी येऊन हिरावला गेला आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून भरपाई जाहीर करावी, ही माझी आग्रही मागणी राहील,” असेही खासदार किरसान यांनी नमूद केले.
या दौऱ्यात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, काँग्रेस नेते विनोद बोरकर, माजी जि.प. सदस्य खोजराम मरसकोल्हे, सरपंच देवेंद्र गेडाम, दिलीप पाटील गायकवाड, टिकेश्वर मस्के, कैलास अमृतकर, लुकेश निमगडे, विलासजी भाकरे, प्रदीप येसनसुरे, अनिल डोर्लीकर, राजू डोर्लीकर, साईनाथ डोंगरवार, जगदीश ठवरे यांच्यासह अनेक स्थानिक शेतकरी, ग्रामसेवक, तलाठी व कृषी अधिकारी उपस्थित होते.
शासनाकडून त्वरित मदतीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत असून, येत्या काही दिवसांत शासन निर्णय घेईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
