रक्षकच झाले विकासदूत ; गडचिरोली पोलिसांनी श्रमदानातून बांधला पूल

25

– लिंगापूर टोला गावाला मिळाला नवसंजीवनीचा दिलासा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम लिंगापूर टोला गावासाठी पावसाळा म्हणजे एक वेदनादायक काळ. नाल्याला येणाऱ्या पुरामुळे गावाचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो, रुग्णसेवा अडते, विद्यार्थी शाळांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. मात्र यावर्षी या संकटाला पोलिसांनी थेट हात घालून एक प्रेरणादायी उदाहरण घडवले. गडचिरोली पोलिसांनी आणि एसआरपीएफ जवानांनी श्रमदानातून गावाजवळ पूल उभारला.
उपपोस्टे झिंगानूर हद्दीतील लिंगापूर टोला येथे २८ जुलै रोजी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये झिंगानूर पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी तसेच एसआरपीएफच्या जवानांनी स्वतः पुढाकार घेत, बांधकाम साहित्य वाहून नेले, खड्डे खणले आणि स्थानिकांच्या रोजच्या संघर्षावर एक मजबूत पूल उभा केला.
या समाजाभिमुख उपक्रमामुळे केवळ लिंगापूर गावच नव्हे, तर संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांविषयी आत्मीयता व विश्वास वाढला आहे. केवळ कायदा व सुव्यवस्था राखणे नव्हे, तर समाजाच्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी पोलिस कसे सज्ज आहेत, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.
या उपक्रमासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी-प्राणहिता) सत्य साई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. अभिजीत घोरपडे, ओंकार हेगडे, अनिकेत खोपडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यवाही पार पाडली.
पोलिसांची वर्दी फक्त शिस्तीची नाही, तर माणुसकीचीही असू शकते, हे या पूल बांधणी उपक्रमाने पुन्हा सिद्ध झाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #tadobaforest #गडचिरोलीपोलीस #श्रमदान #समाजाभिमुखपोलिसिंग #लिंगापूरटोला #पूलबांधणी #गडचिरोलीविकास #SRPF #पोलीससेवा #CommunityPolicing #HumanityFirst

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here