सुरजागड इस्पातला हिरवी झेंडी ; जनसुनावणीत जनतेचा सकारात्मक प्रतिसाद

117

The गडविश्व
गडचिरोली, दि.२५ : गडचिरोली जिल्ह्यात उद्योगविकासाच्या दिशेने मोठे पाऊल टाकत सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्पाच्या पर्यावरणविषयक जनसुनावणीला स्थानिक जनतेने हिरवा कंदील दिला. २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांच्या अध्यक्षतेत अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथील सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची पर्यावरणविषयक जनसुनावणी शांततामय पार पडली. या सुनावणीत नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, मात्र पर्यावरण संरक्षण, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्याची सूचना केली तसेच यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करताना प्रदूषण न करण्याच्या सूचना देण्यासह सोयीसुविधा व स्थानिकांना रोजगार देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सुनावणीत आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार डॉ. देवराव होळी, दीपक आत्राम, तसेच राजकीय नेते, स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोजगार आणि विकासाला चालना

सुरजागड इस्पात प्रकल्पांतर्गत बेनिफिशिएशन प्लांट, पॅलेट प्लांट, स्पंज आयर्न प्लांट, इंडक्शन फर्नेस, रोलिंग मिल आणि १५० मेगावॅट क्षमतेचा कॅप्टिव्ह पॉवर प्लांट उभारला जाणार आहे. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

९०० झाडांच्या बदल्यात १ लाख वृक्षारोपण

पर्यावरणपूरक विकासाची ग्वाही देताना कंपनीने ९०० वृक्षांच्या बदल्यात १ लाख झाडांची लागवड करण्याचे आश्वासन दिले. आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी या प्रकल्पासाठी स्वतःची जमीन दिली असून, या उद्योगामुळे जिल्ह्यातील बेरोजगारी दूर होऊन नक्षलवाद्यांच्या प्रभावाला आळा बसेल, असे त्यांनी सांगितले.

स्थानिकांचा विश्वास आणि विकासाची नवी दिशा

गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि उद्योगविहीन जिल्ह्यात हा प्रकल्प एक विकासदूत ठरणार आहे. सरकारने आणखी उद्योगांना संधी दिल्यास गडचिरोली जिल्ह्याचा विकास वेगाने होईल, असे स्थानिक नेतृत्वाने मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here