मुरुमगाव येथे केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक संमेलनाचे जंगी उद्घाटन
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २६ : धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा, कला व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी आयोजित केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा व सांस्कृतिक कला संमेलनाचे उद्घाटन २५ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, मुरुमगाव यांच्या वतीने या भव्य संमेलनाचे उद्घाटन भूपेंद्र शहा मडावी महाराज यांच्या हस्ते झाले. सहउद्घाटक म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खेमराज खोब्रागडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच शिवप्रसाद गवर्णा यांनी भूषवले.
कार्यक्रमास माजी पं.स. सभापती अजमनजी राऊत, सरपंच शेवंताबाई हलामी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन ठेंग, केंद्रप्रमुख अरुण सातपुते, उपसरपंच मथनुराम मालिया, माजी पं.स. सदस्य जयलालजी मार्गीया, पत्रकार शरीफभाई कुरेशी यांसह ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहण करून प्रमुख अतिथींनी मानवंदना स्वीकारली. केंद्रप्रमुख अरुण सातपुते यांनी क्रीडाशपथ देत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहउद्घाटक खेमराज खोब्रागडे यांनी “क्रीडेमुळे विद्यार्थ्यांमध्ये बल, शिस्त, सेवा, त्याग, धैर्य व नेतृत्वगुण विकसित होतात,” असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात सरपंच शिवप्रसाद गवर्णा यांनी ग्रामपंचायतीकडून बेलगाव, खेडेगाव, आंमपायली आदी गावांसाठी खेळ साहित्याच्या निधीचे समान वाटप करण्यात येत असल्याचे सांगत, स्पर्धा शांततेत व उत्साहात पार पाडण्याचे आवाहन केले.
क्रीडा संमेलनात केंद्रातील १८ संघ सहभागी झाले असून, विद्यार्थ्यांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उद्घाटनीय कबड्डी सामन्यात मुरुमगाव संघाने पन्नेमरा संघावर १४० गुणांनी विजय मिळवत प्रभावी सुरुवात केली.
कार्यक्रमाचे संचालन जगदीश बावणे व संगीता भडके यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका गायत्री खेवले यांनी मानले. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रातील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.














