The गडविश्व
चामोर्शी, २ मार्च : नालीवर अतिक्रमण करून शौचालय व बाथरूमचे बांधकाम करणे ग्रापंचायत सदस्यास चांगले भोवले असून जिल्हाधिकारी यांनी कारवाई करत अपात्र घोषित केले आहे.
चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत मोहुर्ली येथील सदस्या ऊर्मिला ढिवरु मडावी यांनी शासकीय नालीवर अतिक्रमण करून शौचालय व बाथरूमचे बांधकाम केले होते. याबाबत ग्रा.प.सदस्य मारोती आगरे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांचेकडे तक्रार दाखल करुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ (१) (ज – ३) नुसार कारवाई करण्याची मागणी केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याचे समजताच कारवाई पासून बचावासाठी ग्रा.पं.सदस्या उर्मिला मडावी यांनी जेसीबी लावून शौचालय व बाथरूमचा खालचा भाग पाडून टाकला होता. मात्र चौकशी दरम्यान ग्रा.पं.सदस्या उर्मिला मडावी यांनी शासकीय नालीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी १४ फेब्रुवारी रोजी त्यांना पदावर राहण्यास अनर्ह ठरविले असून सदस्य पद रिक्त झाल्याचे घोषित केले आहे. यामुळे उर्मिला मडावी यांचे शौचालय व बाथरूमही गेले आणि सदस्यपदही गेले असल्याची परिसरात चर्चा आहे. सदर कारवाईने शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणार्यांचे ढाबे दणाणले असून जिल्ह्यात पुन्हा किती लोकांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे व त्यावर काय कारवाई करण्यात येईल हा संशोधनाचा विषय आहे.
