– स्थानिक रोजगार आणि औद्योगिक पुनरुज्जीवनाला चालना
The गडविश्व
सोलापूर, दि. १९ : राजुरी (ता. माढा) येथील गोविंद पर्व साखर कारखाना अखेर राणा शिपिंग कंपनीकडे अधिकृतपणे सुपूर्त करण्यात आला असून, यामुळे स्थानिक औद्योगिक क्रियाशीलतेला मोठा हातभार लागणार आहे.
हा कारखाना आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक आणि सेवानिवृत्त शिक्षक लालासाहेब जगताप यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जावर सुरू केला होता. मात्र तांत्रिक अडचणी व चुकीच्या व्यवस्थापनामुळे तो काही वर्षांपूर्वी बंद पडला. यानंतर जिल्हा बँकेचे कोट्यवधी रुपये थकीत राहिल्याने बँकेने थेट NCLT (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण) मुंबई खंडपीठात याचिका दाखल केली.
न्यायालयीन निर्णय बँकेच्या बाजूने लागल्यानंतर, रिझोल्यूशन प्रोफेशनलच्या देखरेखीखाली राणा शिपिंग कंपनीने निविदा रक्कम भरून कारखाना विकत घेतला. सर्व कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून १७ जुलै २०२५ रोजी कारखान्याचा ताबा अधिकृतरित्या राणा शिपिंगकडे हस्तांतरित करण्यात आला.
या व्यवहारातून जिल्हा बँकेचे सुमारे पावणे पाच कोटी रुपये वसूल झाले असून उर्वरित थकबाकी संचालक मंडळाच्या वैयक्तिक मालमत्तेतून वसूल करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
राणा शिपिंग कंपनीचे प्रमुख श्री राणा सूर्यवंशी यांचा पूर्वीपासूनच या प्रकल्पाशी संबंध होता. सुरुवातीला त्यांना दूर ठेवण्याचे प्रयत्न झाले, मात्र त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांनी अखेर हा कारखाना खरेदी केला. त्यांच्या धाडसाचे व चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापुढे तेच कारखान्याचे संचालन करणार आहेत.

स्थानिक रोजगाराला नवे बळ
कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या राणा शिपिंग कंपनीच्या निर्णयानंतर परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर ४०० ते ५०० स्थानिक रोजगार निर्माण होणार असून, प्लाय लाकूड विभाग स्थापन करून उत्पादनातील अवशिष्टाचा वापर करून पूरक रोजगार संधी निर्माण करण्याचेही नियोजन आहे.
यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला असून, जिल्ह्यातील आर्थिक व औद्योगिक घडामोडींना गती मिळेल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. ही संपूर्ण प्रक्रिया हे स्थानिक औद्योगिक पुनरुज्जीवनाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #गोविंदपर्वकारखाना #राणा_शिपिंग_कंपनी #औद्योगिकपुनरुज्जीवन #सोलापूर #स्थानीयरोजगार #NCLT #जिल्हाबँक #राणा_सूर्यवंशी #साखरकारखाना #माढा #प्लायलाकूड #शेतीपूरकउद्योग #ग्रामीणविकास #MaharashtraIndustry #IndustrialRecovery