ॲट्रोसिटी खून प्रकरणातील मृतांच्या वारसांना सरकारी नोकरी :
गडचिरोलीत अर्ज प्रक्रिया सुरू
– १५ डिसेंबर अंतिम मुदत
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल खून प्रकरणांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक व सामाजिक आधार देण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार अशा प्रकरणांमध्ये दिवंगत व्यक्तीच्या एका पात्र वारसास गट-क अथवा गट-ड संवर्गातील शासकीय किंवा निमशासकीय नोकरी दिली जाणार आहे. कुटुंबातील कमावत्या सदस्याचा मृत्यू, त्यानंतरची आर्थिक असुरक्षितता आणि मानसिक आघात लक्षात घेऊन ही योजना पीडित कुटुंबांना दिलासा देणारी ठरणार आहे.
या नियुक्ती प्रक्रियेचा पहिला टप्पा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय दक्षता समितीमार्फत पार पडणार आहे. संबंधित प्रकरणांची छाननी, पात्रतेचे निकष व कागदपत्रांची तपासणी करून समिती आपल्या शिफारसी समाज कल्याण विभागास पाठवेल. त्यानंतर समाज कल्याण व आदिवासी विकास विभागातील उपलब्ध रिक्त पदांचा विचार करून पात्र वारसास नियुक्ती दिली जाणार असून अंतिम मंजुरीचा अधिकार पुणे येथील समाज कल्याण आयुक्तांकडे आहे. शासनाने स्पष्ट सूचना देत सर्व विभागांना 26 जानेवारी 2026 पूर्वी सर्व प्रलंबित नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
गडचिरोलीतील सर्व पात्र पीडित कुटुंबीयांनी आवश्यक कागदपत्रे 15 डिसेंबर 2025 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात जमा करता येतील. पात्र वारसांमध्ये प्रथम प्राधान्य दिवंगत व्यक्तीची पत्नी किंवा पती यांना दिले जाणार असून, तसेच विवाहित-अविवाहित मुलगा-मुलगी, कायदेशीर दत्तक मुले, सून, घटस्फोटीत किंवा विधवा मुलगी-बहीण, तसेच व्यक्ती अविवाहित असल्यास भाऊ किंवा बहीण अर्ज करण्यास पात्र आहेत.
ही माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी दिली असून सर्व पात्र कुटुंबांनी अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














