– तुरळक साधनसंपत्तीवर संताप; उपाययोजनांचा दिला शब्द
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २९ : तालुक्यातील अतिदुर्गम गोडलवाही परिसरात मलेरियाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी शुक्रवार, २७ जून रोजी दुपारी २ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्राला (P.H.C. Godalwahi) अचानक भेट देत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
या दौऱ्यात डॉ. नरोटे यांनी केंद्रातील आरोग्य सेवा, औषधसाठा, कर्मचारी उपलब्धता तसेच नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा तपासून पाहिल्या. त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत आरोग्यविषयक तक्रारी समजून घेतल्या. विशेषतः गोडलवाही परिसरात मलेरियाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र समोर येताच, त्यांनी तात्काळ चिंता व्यक्त केली.
“मलेरियाचा प्रादुर्भाव ही गंभीर बाब असून, यावर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज आहे,” असे मत डॉ. नरोटे यांनी व्यक्त केले. प्रशासनासोबत समन्वय साधून आवश्यक मनुष्यबळ, औषधे व प्रतिबंधक उपायांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
या दौऱ्यात भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर, तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, सारंग साळवे, सुभाष धाईत, सुभाष खोबरे, राकेश दास, गजानन परचाके तसेच प्रा. आ. केंद्राच्या डॉ. पूजा परशुरामकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या गोडलवाही परिसरात मलेरियाच्या संसर्गामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आमदार डॉ. नरोटे यांची तातडीची उपस्थिती आणि सकारात्मक आश्वासने नागरिकांना दिलासा देणारी ठरत आहेत.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice