“गो मलेरिया गो – पालकमंत्री दो!” : गडचिरोलीत काँग्रेसचं थाळी-ताली आंदोलन

47

– मलेरिया, औषधटंचाई आणि आरोग्य व्यवस्थेच्या अपयशावर संतप्त हल्ला
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून, प्रशासन आणि शासन या दोघांच्याही निष्क्रियतेमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. आरोग्य सेवांतील ढिसाळ कारभार, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचारी व औषधांचा अभाव, तसेच उपजिल्हा रुग्णालयांच्या सुविधा कोलमडल्या असून, त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने आज भर पावसात संतप्त थाळी-ताली आंदोलन करत “गो मलेरिया गो – पालकमंत्री दो!” अशा घोषणा देत प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला.
या आंदोलनाचं नेतृत्व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केलं. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी थाळ्या-ताळ्या वाजवत आरोग्य यंत्रणेच्या अपयशाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
गडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे केवळ गेल्या चार दिवसांतच १० नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती काँग्रेसने दिली. मलेरिया प्रतिबंधक उपाययोजना वेळेवर न झाल्यामुळे ही गंभीर स्थिती उद्भवली आहे, असा आरोप काँग्रेसने केला.
जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अद्यापही आरोग्य सेविका व कर्मचारी उपलब्ध नाहीत. काही केंद्रांमध्ये तर औषधसाठाही पोहोचलेला नाही. त्यामुळे नागरिकांना उपचारासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच स्थिती उद्भवत असूनही शासन व प्रशासन वेळेवर उपाययोजना करत नाही, अशी टीका यावेळी करण्यात आली.
कोरोना काळात जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट्स उभारण्यासाठी लाखो रुपयांची टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र काम अपूर्ण राहिल्याने आजही अनेक प्लांट्स धूळ खात पडून आहेत. या प्लांट्सची तातडीने दुरुस्ती करून कार्यान्वित करावे आणि नव्याने आवश्यक तेथे ऑक्सिजन प्लांट्स उभारावेत, अशी ठाम मागणी काँग्रेसने केली. तसेच जिल्ह्यातील सर्व रिक्त वैद्यकीय पदांची भरती तातडीने करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
या आंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेसने जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्यांचा संपूर्ण आराखडा प्रशासनासमोर मांडला. जिल्हा आरोग्य अधिकारी व शल्य चिकित्सक यांना निवेदन सादर करून या समस्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. विश्वजीत कोवासे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ऍड. कविता मोहरकर, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रेय खरवडे, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, सोशल मीडिया उपाध्यक्ष नंदुजी वाईलकर, माजी नगरसेवक रमेश चौधरी, जिल्हा महासचिव घनश्याम वाढई, काँग्रेस उपाध्यक्ष दिलीप घोडाम, अनिल कोठारे, हरबाजी मोरे, दिवाकर निसार, स्वप्नील बेहरे, सुभाष धाईत, सुधीर बांबोळे, नीलकंठ पेंदाम, दीपक चौधरी, यादव गेडाम, निखिल पुण्यप्रेडिवार, महिला पदाधिकारी कल्पना नंदेश्वर, सौ. कविता उराडे, सौ. शालिनी पेंदाम आदींसह शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास येत्या काळात काँग्रेसकडून अधिक तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #MalariaCrisis #HealthSystemFailure #CongressProtest #ThaliTaliProtest #GoMalariaGo #DemandGuardianMinister #PublicHealthCrisis #OxygenPlantIssue #GadchiroliNews #HealthcareNegligence #CongressMovement #MedicalStaffVacancy #HealthInfrastructure #MalarialDeaths
#गडचिरोली #मलेरिया #आरोग्यव्यवस्था #काँग्रेसआंदोलन #थाळीबजावआंदोलन #गोमलेरियागो #पालकमंत्रीदो #गडचिरोलीआरोग्यखोळंबा #गडचिरोलीकाँग्रेस #आरोग्यसेवा #मृत्यूंचीसांख्यावाढ #ऑक्सिजनप्लांट #गडचिरोलीबातमी #जिल्हा_आंदोलन #लोकतेचेप्रश्न

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here