– स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचा एल्गार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : विदर्भाचे स्वतंत्र राज्य तातडीने स्थापन करण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने ९ ऑगस्ट रोजी नागपूर येथे तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. संविधान चौकात क्रांती दिनाचे औचित्य साधून दुपारी १२ ते ४ दरम्यान “महाराष्ट्रवादी और विदर्भविरोधी चले जाओ” या घोषवाक्याखाली हे निदर्शने आंदोलन होणार आहे अशी माहिती गडचिरोली येथे बुधवार ६ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
पत्रकार परिषदेत सांगितले, आंदोलन समितीने केंद्र सरकारकडे संविधानातील कलम ३ च्या आधारे विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा तातडीने देण्याची मागणी केली आहे. विदर्भावरील आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक अन्याय अधोरेखित करत समितीने स्पष्ट केले की, महाराष्ट्र सरकार विदर्भाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे.
महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्थिती ढासळलेली असून राज्याचे महसुली उत्पन्न ५.६० लाख कोटी असताना मार्च २०२५ अखेर राज्यावर ७.८२ लाख कोटींचे कर्ज आहे. त्यावरील व्याजाचा बोजा ५६,७२७ कोटी रुपये इतका असून याव्यतिरिक्त १३ हजार कोटींचे कर्ज मंजुरीनंतर घेतले आहे. इतकेच नाही तर आगामी गरजांसाठी केंद्र सरकारकडे आणखी १.३२ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची विनंती करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२५ अखेर हा एकूण कर्जबोजा ९.८३ लाख कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे.
या आर्थिक डोंगराखाली दबलेले राज्य सरकार विदर्भाच्या ६० हजार कोटींच्या सिंचन अनुशेषासह सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, उद्योग, ऊर्जा, रस्ते, पाणीपुरवठा, ग्रामविकास, आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागाच्या १५ हजार कोटींच्या निधी अनुशेषाची भरपाई कदापिही करू शकत नाही. परिणामी एकूण ७५ हजार कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता नाहीच.
या आर्थिक असमतोलामुळे विदर्भाची सिंचन क्षमता वाढवता येत नाही, शेतकरी आत्महत्या थांबवता येत नाहीत, कुपोषण आणि बालमृत्यू रोखता येत नाहीत. औष्णिक वीज प्रकल्पातील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू शकत नाही. रोजगाराच्या संधींचा अभाव असल्याने तरुण नक्षलवादाकडे वळत आहेत. बेरोजगारीमुळे स्थलांतर वाढले असून विदर्भातील लोकसंख्या घटल्यामुळे चार आमदार व एक खासदार अशी लोकप्रतिनिधींंची संख्याही कमी झाली आहे. ती पुन्हा वाढण्याची शक्यताही नाही.
या पार्श्वभूमीवर “स्वतंत्र विदर्भ राज्य” हाच एकमेव उपाय असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे. हे आंदोलन ही मागणी अधिक तीव्र करण्यासाठीच असून केंद्र सरकारने यथाशीघ्र निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
याशिवाय पूर्व विदर्भात स्वतंत्र विदर्भ राज्याची चळवळ अधिक गतीने पोहचविण्यासाठी “विदर्भ निर्माण संकल्प मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार, १७ ऑगस्ट २०२५ रोजी गोंदिया येथील यशोदा सभागृहात दुपारी १२ ते ४ दरम्यान पार पडणार असून, पूर्व विदर्भातील सर्व विदर्भवाद्यांनी या मेळाव्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही आंदोलन समितीने यावेळी केले.
पत्रकार परिषदेला या पत्रकार परीषदेला ॲड. वामनराव चटप यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर (मरकाम), जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे, दक्षिण गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, जुम्मन शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchiroli #VidarbhaStatehood #SeparateVidarbha #VidarbhaMovement #NagpurProtest #Article3 #MaharashtraCrisis #EconomicInequality #FarmersSuicide #UnemploymentCrisis #BackwardVidarbha #VidarbhaRights #JusticeForVidarbha #ChaleJaoMovement #IndependentVidarbha #VidarbhaDevelopment #स्वतंत्रविदर्भ #विदर्भराज्यआंदोलन #विदर्भहक्कासाठी #विदर्भवाद #नागपूरआंदोलन #९ऑगस्टआंदोलन #विदर्भाचेअन्याय #शेतकरीआत्महत्या #विदर्भविकास #तरुणांचेस्थलांतर #नक्षलप्रवृत्ती #सिंचनअनुशेष #शैक्षणिकअन्याय #आदिवासीविकास #विदर्भासाठीएकत्र
