प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या प्रस्तावाची त्वरित ऑनलाइन नोंदणी करून लाभार्थ्यांना लाभ घ्या

115

– भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांची मागणी
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ०५ : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून डोक्यावरचे छत्र हरविलेल्या कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला जात आहे, आणि सामान्य माणसाला आधार देण्यासाठी या योजना लागू करण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत अनेक पात्र लाभार्थ्यांना फायदा मिळालेला आहे. परंतु, काही लाभार्थ्यांनी भारतीय स्टेट बँक आणि इतर बँकांमार्फत विमा काढला आहे, तरीदेखील काही लाभार्थ्यांच्या वारसांना अद्याप या विमा योजनांचा लाभ मिळालेला नाही. या संदर्भात योग्य दखल घेऊन संबंधित लाभार्थ्यांच्या वारसांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत आणि त्यांची समस्या लवकरात लवकर निकाली काढावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी भारतीय स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकांशी चर्चा करून निवेदनाद्वारे केली आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना भारत सरकारच्या पाठबळाने महत्त्वपूर्ण योजनांमध्ये गणली जातात. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 18 ते 50 वयोगटातील लाभार्थ्यांना वार्षिक 436 रुपये प्रीमियम भरून या योजनेचा लाभ मिळवता येतो. या योजनेत नैसर्गिक मृत्यू झाल्यास लाभ दिला जातो. तसेच, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 18 ते 70 वयोगटातील व्यक्तींकरिता आहे आणि त्याचा वार्षिक प्रीमियम 20 रुपये आहे. या योजनेचा लाभ अपघाती मृत्यूच्या परिस्थितीत दिला जातो. दोन्ही योजनांत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना दोन लाख रुपये विमा दिला जातो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक लाभार्थी बँकेत विमा काढतात, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना कधी कधी कागदपत्रे सादर करून अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे, पात्र लाभार्थ्यांची त्वरित ऑनलाइन नोंदणी करून त्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी चांगदेव फाये यांनी केली आहे.
संकटाच्या काळात मदतीसाठी जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना महत्त्वपूर्ण ठरतात. सर्वांनी या विमा योजनांचा संकटकाळी लाभ घेण्यासाठी आपली बँक खात्याद्वारे विमा काढावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here