गट्टा ग्रामपंचायत विविध समस्यांच्या विळख्यात ; प्रशासनाचा भोंगळ कारभार
– मुख्य रस्त्यावर पाईपलाइन फुटी, सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे, दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १७ : धानोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गट्टा ग्रामपंचायतीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, पायाभूत सुविधांच्या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष व आदी कर्मयोगी अभियानांतर्गत ग्रामसभेत मंजूर केलेले नियोजन शासनाकडे पाठविण्यात आले असले तरी, प्रत्यक्ष अंमलबजावणी अभावी ग्रामपंचायत विविध समस्यांच्या विळख्यात अडकली आहे.
गावातील चातगाव–गट्टा–पेंढरी हा महत्त्वाचा आंतरराज्य मार्ग असून, याच मुख्य रस्त्यावर पाणीपुरवठा पाईपलाइन अनेक ठिकाणी फुटलेल्या अवस्थेत आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे दूषित पाणी नागरिकांच्या घरी पोहोचत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हर घर जल योजनेत प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी देण्याचे उद्दिष्ट असताना फुटलेल्या पाईपमुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, मलिन पाणीपुरवठा सुरू आहे.
याशिवाय गावात कचऱ्याचे ढिगारे सर्वत्र पसरलेले असून, कचराकुंड्या भरून वाहत आहेत. स्वच्छ भारत मिशनच्या निर्देशानुसार कचरा उचलण्यासाठी उपलब्ध असलेल्या दोन घंटागाड्यांपैकी एक गाडी मोडकळीस आली असून, दुसरी गाडी ग्रामपंचायतीत अस्तित्वातच नसल्याचे चित्र दिसत आहे. कचऱ्यावर दुर्गंधी व वाढती अस्वच्छता यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे.
गावात पोलीस मदत केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आश्रम शाळा, उपकेंद्र अशी शासकीय साधने असली तरी नाल्यांच्या अभावामुळे पाणी रस्त्यांवर वाहते, अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य आहे आणि काही वस्त्यांत तर रस्तेच अस्तित्वात नाहीत. प्रशासनाची निष्क्रियता उघड उघड जाणवत आहे.
समस्यांबाबत विचारणा केली असता, गट्टा ग्रामपंचायत अधिकारी जीवनदास ठाकरे यांनी, “मी नुकताच एक महिन्यापूर्वी पदभार स्वीकारला असून, परिस्थितीची अद्याप पूर्ण माहिती झाली नाही,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
गट्टा ग्रामपंचायतचा विकास थांबलेला असून, नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गावातील वाढती अराजकता पाहता ग्रामपंचायतीकडून तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews














