१०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत गडचिरोलीचा सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

28

The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी आणि त्यांच्या टीमचे जिल्हा प्रशासनातर्फे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. राज्यातील सर्व महसूली व जिल्हास्तरीय विभागांमध्ये गडचिरोलीचे सामाजिक न्याय कार्यालय हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
या मोहिमेअंतर्गत गडचिरोली कार्यालयात विविध सुधारणा राबवण्यात आल्या. त्यात ‘आपला दोस्तालू / आपला स्नेहीतुडू’ हा ९४२३११६१६८ क्रमांक असलेला व्हॉट्सॲप सुविधा क्रमांक सुरू करण्यात आला आहे. यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना घरबसल्या समाजकल्याण योजना समजून घेता येतात.
शिक्षण आणि सुविधा क्षेत्रातही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. १५० विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित अभ्यासिका व २०० क्षमतेचा सुसज्ज प्रशिक्षण हॉल उभारण्यात आला आहे. कार्यालयीन कागदपत्रांचे डिजिटल वर्गीकरण करीत संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड रूम तयार करण्यात आली आहे.
ऊर्जेच्या बचतीसाठी ‘झिरो एनर्जी’ संकल्पनेअंतर्गत ऑन-ग्रिड सोलर सिस्टीम बसविण्यात आली असून, स्वच्छता, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह व्यवस्थापनातही दर्जात्मक सुधारणा झाल्या आहेत.
एक अभिनव उपक्रम म्हणून, निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना थेट विमानाने इस्रो (ISRO) भेटीस नेण्यात आले, ज्यामुळे त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला.
या सर्व उपाययोजनांमुळे कार्यालयाची कार्यक्षमता वाढली असून नागरिकांना सेवा अधिक सुलभ व पारदर्शकपणे मिळू लागल्या आहेत. डॉ. मडावी यांच्या नेतृत्वाखालील टीमचे जिल्हा प्रशासनाने विशेष कौतुक केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here