गडचिरोलीचे ‘चुरचुरा’ ठरले १०० टक्के धूरमुक्त गाव

20

गडचिरोलीचे ‘चुरचुरा’ ठरले १०० टक्के धूरमुक्त गाव
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गडचिरोली जिल्ह्यातील चुरचुरा गावाने धूरमुक्ततेचा आदर्श निर्माण करत संपूर्ण राज्यासाठी नवा मार्ग दाखविला आहे. चुरचुरा हे गाव आता १०० टक्के गॅस सिलेंडरयुक्त झाले असून जंगलावरचे अवलंबित्व संपुष्टात आणत मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले. चुरचुराचा हा आदर्श प्रयोग लवकरच संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
चुरचुरा येथे आयोजित गॅस सिलेंडर वितरण कार्यक्रमात बोलताना सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले की, चूल पेटविण्यासाठी सरपण गोळा करण्याच्या निमित्ताने जंगलात जाण्याची वेळ कोणत्याही गावावर येऊ नये, हा शासनाचा स्पष्ट संकल्प आहे. जंगलात लाकूड गोळा करताना होणारे वन्यप्राण्यांचे हल्ले आणि त्यातून उद्भवणारा मानव-वन्यजीव संघर्ष कायमचा थांबविण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच कार्यक्रमात त्यांच्या हस्ते चुरचुरा ग्रामपंचायत सभागृहाच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजनही करण्यात आले.
यापूर्वी चुरचुरा गावातील ९२ कुटुंबांकडे गॅस जोडणी होती, मात्र ७२ कुटुंबे या सुविधेपासून वंचित होती. आता या सर्व ७२ कुटुंबांना दोन सिलेंडरसह गॅस जोडणी देण्यात आल्याने संपूर्ण गाव पूर्णतः धूरमुक्त झाले आहे. गावकऱ्यांना उद्देशून बोलताना ॲड. जयस्वाल यांनी चुरचुरा गावाने ‘उत्पादक गाव’ म्हणून पुढे यावे, असे आवाहन करत आर्थिक उलाढाल वाढल्यास गावात समृद्धी येईल, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण जनतेचा वकील म्हणून विधानसभेत त्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी माहिती देताना सांगितले की, वनव्यवस्थापन निधीतून ११ लाख रुपयांचा खर्च करून चुरचुरा गाव धूरमुक्त करण्यात आले आहे. मागील भेटीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात आले असून आगामी काळात शासनाच्या विविध निधीतून गावात आर.ओ. शुद्ध पाणी, स्ट्रीट लाईट तसेच इतर प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमानंतर सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी आरमोरी तालुक्यातील इंजेवाडी व देऊळगाव येथे भेट देत बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुदाताई मेश्राम व मुक्ताबाई नेवारे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व शासकीय मदतीचे धनादेश सुपूर्द केले. परतीच्या प्रवासात देऊळगाव येथील धनपाल यांनी ताफा थांबवून वाघाच्या हल्ल्याची माहिती दिल्यानंतर सहपालकमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळावरूनच वनविभागाला संबंधित कुटुंबाला नियमानुसार तातडीची शासकीय मदत देण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या या तत्पर व संवेदनशील भूमिकेचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
या दौऱ्यात उपवनसंरक्षक श्रीमती आर्या, सरपंच खोब्रागडे, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज म्हशाखेत्री, सुरजसिंग चंदेल तसेच इतर संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here