– जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली प्रक्रिया
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत एकूण ५१ जिल्हा परिषद निवडणूक विभागातील सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात दुपारी ४.०० वाजता पार पडला. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. ही सोडत महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, २०२५ नुसार आयोजित करण्यात आली होती.
सदर आरक्षण सोडत उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. या प्रसंगी नायब तहसिलदार (निवडणूक) हेमंत मोहरे आणि सहाय्यक महसूल अधिकारी श्री. प्रशांत चिटमलवार उपस्थित होते. सोडतीच्या या सभेला गडचिरोली जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, संभाव्य उमेदवार, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत पद्धतीने व पारदर्शक रीतीने पार पडली.
या सोडतीत जिल्हा परिषदेच्या १२ तालुक्यांतील ५१ निवडणूक विभागांचा समावेश असून त्यामध्ये कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा तालुके आहेत. प्रत्येक तालुक्यातील विभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले असून त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नामनिर्देशित प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव जागांचा समावेश आहे.
कोरची तालुक्यातील कोटरा-बिहिटेकला हा विभाग अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी, बेडगाव-कोटगुल अनुसूचित जमाती, तसेच कुरखेडा तालुक्यातील पलसगड-पुराडा, तळेगाव-वडेगाव, गेवर्धा-गोठणगाव, कढोली-सावलखेडा आणि अंगारा-येंगलखेडा हे विभाग अनुक्रमे अनुसूचित जमाती व नामाप्र महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले. देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव-डोंगरगाव (हलबी) अनुसूचित जमाती महिला, विसोरा-सांवगी नामाप्र, तर कुरुड-कोकडी नामाप्र महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले.
आरमोरी तालुक्यात वैरागड-मानापूर सर्वसाधारण, पळसगाव-जोगीसाखरा अनुसूचित जमाती महिला, तर ठाणेगाव-इंजेवारी नामाप्र प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. धानोरा तालुक्यात सिर्सी-वडधा सर्वसाधारण, मुस्का-मुरुमगाव अनुसूचित जमाती, येरकड-रांगी व चातगाव-कारवाफा अनुसूचित जमाती महिला, तसेच पेंढरी-गट्टा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले.
गडचिरोली तालुक्यात मौशिखांब-मुरमाडी व वसा-पोर्ला अनुसूचित जमाती व नामाप्र प्रवर्गासाठी, कोटगल-मुरखळा नामाप्र महिला, जेप्रा-विहिरगाव अनुसूचित जाती, तर मुडझा-येवली नामाप्र महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. चामोर्शी तालुक्यात कुनघाडा रै-तळोधी मो. सर्वसाधारण महिला, विसापूर रै-कुरुळ सर्वसाधारण महिला, विक्रमपूर-फराडा नामाप्र महिला, भेंडाळा-मुरखळा व लखमापूर बोरी-गणपूर रै नामाप्र, हळदवाही-रेगडी सर्वसाधारण, घोट-सुभाषग्राम सर्वसाधारण महिला, दुर्गापूर-वायगाव सर्वसाधारण महिला, आणि आष्टी-इल्लूर सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत.
मुलचेरा तालुक्यात कालीनगर-विवेकानंदपूर नामाप्र महिला, सुंदरनगर-गोमणी सर्वसाधारण महिला आणि कोठारी-शांतीग्राम नामाप्र महिला या जागांची निश्चिती करण्यात आली. एटापल्ली तालुक्यातील जारावंडी-कसनसूर, गट्टा-हेडरी हे विभाग अनुसूचित जमाती, तर गेदा-हालेवारा आणि पंदेवाही-बुर्गी हे विभाग अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले.
भामरागड तालुक्यात आरेवाडा-लाहेरी अनुसूचित जमाती, कोठी-येचली अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले. अहेरी तालुक्यात खमनचेरू-नागेपल्ली अनुसूचित जमाती महिला, वेलगुर-आलापल्ली सर्वसाधारण, महागाव-देवलमारी अनुसूचित जमाती, पेरमीली-राजाराम अनुसूचित जमाती महिला, रेपनपल्ली-उमानूर अनुसूचित जाती, तर जिमलगट्टा-पेठा अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या.
सिरोंचा तालुक्यात झिगांनूर-आसरअल्ली सर्वसाधारण, विठ्ठलरावपेठा माल-जाफ्राबाद चेक, नारायणपूर-जानमपल्ली आणि लक्ष्मीदेवीपेठा अंकिसा माल या चारही विभागांचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले.
या आरक्षण सोडतीनुसार एकूण ५१ विभागांपैकी २० जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (त्यापैकी १० महिला), ५ जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (त्यापैकी ४ महिला), १० जागा नामनिर्देशित प्रवर्गासाठी, तर उर्वरित जागा सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठरल्या आहेत.
या पारदर्शक पद्धतीने झालेल्या सोडतीनंतर आता जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला वेग येणार आहे. निवडणूक कार्यक्रमाची औपचारिक घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














