पुढील दहा वर्षांत महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्ह्यांत गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

22

पुढील दहा वर्षांत महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्ह्यांत गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– भयाचा अंधार संपला, विकासाचा उजेड पसरला – गडचिरोलीचा नवा अध्याय
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गडचिरोली जिल्ह्यात कधीकाळी भयाचे वातावरण होते, मात्र आज येथे विकासाचे, जनतेचे आणि संविधानाचे राज्य प्रस्थापित झाले आहे. गडचिरोली पोलीस दलाने गेल्या काही वर्षांत दाखविलेल्या शौर्य, धैर्य आणि लोकाभिमुख कार्यामुळे जिल्ह्याची वाटचाल भयातून विकासाकडे झाली असून, या परिवर्तनाची साक्ष म्हणजे गडचिरोली महोत्सव असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने आयोजित गडचिरोली महोत्सव या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) छेरींग दोरजे, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, तसेच लॉयड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोली पोलीस दलाने एकीकडे माओवादाविरोधात निर्णायक लढा देत जिल्ह्याला जवळपास पूर्णतः मुक्त केले, तर दुसरीकडे लोकाभिमुख धोरणातून महसूल प्रशासनासोबत समन्वय साधत शासनाच्या विविध योजना जिल्ह्याच्या दुर्गम भागांपर्यंत पोहोचवल्या. या प्रयत्नांमुळेच आज गडचिरोलीत आत्मविश्वासाचे आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
“आज गडचिरोली जिल्ह्याने विकासाची भरारी घेतली आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग आणि पर्यावरण अशा प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. पुढील दहा वर्षांत गडचिरोली महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवेल,” असा ठाम विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी काळात दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून गडचिरोलीचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
गडचिरोली महोत्सवाच्या माध्यमातून कला, क्रीडा, लोकप्रबोधन, नृत्य, गायन आणि मनोरंजन यांच्या माध्यमातून समाजजागृती व सांस्कृतिक एकात्मता साधली जात असून, हा महोत्सव जिल्ह्यातील नागरिकांसाठी हक्काचा, अभिव्यक्तीचा आणि सहभागाचा मंच ठरत असल्याचेही मुख्यमंत्री यांनी नमूद केले.
यावेळी विविध सांस्कृतिक स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले.
या कार्यक्रमाला विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, कलाकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here