– जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : जिल्ह्यातील चामोर्शी येथील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयातील शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून अनिकेत गजेंद्र सोनटक्के (२४, रा. आरमोरी) या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचले असले तरी या प्रकारामुळे महाविद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रा. तुषार भांडारकर व प्रा. पवन दुधबावरे यांनी अनिकेतसह इतर विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देत परीक्षेत पास होण्यासाठी पैशांची मागणी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनिकेतने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत, “पदवी हवी असेल तर पैसे द्या, नाहीतर १० वर्षे लागतील,” अशा धमक्यांचा उल्लेख आहे.तसेच विद्यार्थ्याने एक चितफित तयार केले असून शिक्षकांच्या वागणुकीबाबत त्याने सांगितले आहे सदर व्हिडिओही समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल झाले आहे.
इतकेच नव्हे तर, विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन, छेडछाड व अवमानकारक भाषेचा वापर केल्याचेही आरोप संबंधित शिक्षकांवर झाले आहेत. या घटनांमुळे संतप्त विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली असून, पालकांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला जात आहे.
ही घटना शिक्षण क्षेत्रातील बेशिस्त व अनैतिकतेचे जळजळीत उदाहरण ठरत असून, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #StudentSuicideAttempt #TeacherHarassment #ChamorshiIncident #EducationalInjustice #MentalHarassment #StudentProtest #CorruptionInEducation #GadchiroliNews #MaharashtraNews #BreakingNews
#विद्यार्थीआत्महत्याप्रयत्न #शिक्षकछळ #चामोर्शी #शैक्षणिकअन्याय #मानसिकत्रास #विद्यार्थीआंदोलन #शिक्षणव्यवस्थेतीलभ्रष्टाचार #गडचिरोलीबातमी #महाराष्ट्रबातमी #BreakingNews