गडचिरोली : भरधाव ट्रकने सहा बालकांना चिरडले ; चार ठार, दोघांची प्रकृती गंभीर

4011

– आरमोरी मार्गावरील भीषण अपघाताने जिल्हाभरात संतापाची लाट, नागरिकांचा संतप्त प्रतिक्रिया
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील काटली परिसरात गुरुवार ७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. फिरण्यासाठी गेलेल्या सहा बालकांना भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात ट्रकने चिरडले. यात चार बालकांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत.
अपघातात टिंकू नामदेव भोयर (१४) आणि तन्मय बालाजी मानकर (१६) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुशांत मेश्राम आणि तुषार मारबते या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. क्षितिज मेश्राम आणि आदित्य कोहपरे हे दोघे सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, काटली गावातील ही सहा जण नेहमीप्रमाणे पहाटे व्यायामासाठी बाहेर पडले होते. काटलीजवळील नाल्याजवळ ते व्यायाम करत असताना आरमोरीहून गडचिरोलीकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांना चिरडले. अपघात इतका भीषण होता की काहींचे पाय अक्षरशः चेंदून गेले.
घटनेनंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य व तपास सुरू आहे.
दरम्यान, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणखी कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता गडचिरोली व आरमोरी शहरात तसेच या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. महामार्गावरील मालवाहतूक नियंत्रित ठेवण्यासाठी ट्रकचालकांना स्थानिक ठिकाणी थांबण्याचे आदेश देण्यात आल्याचेही कळते.
या हृदयद्रावक घटनेमुळे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ‘जिल्ह्यातून धावणाऱ्या जड वाहतुकीवर गतीमर्यादा नाही का?’, ‘फक्त स्पीड कॅमेऱ्यांनी उपाय होतो का?’ अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिकांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक : यंत्रणांना तत्काळ मदत व उपचाराची कार्यवाही करण्याचे निर्देश
– मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक युवकाच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत

गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ४ युवकांचा मृत्यू झाला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी मृत युवकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे स्पष्ट केले आहे. या अपघातात आणखी २ युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचारासाठी तातडीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलविण्यात येणार असून त्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या एका तासात त्यांना नागपूरला रवाना करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) हॅण्डल वरून दिली.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1953316821760901366?t=cRzth5h03od4AxVlivq4KA&s=19
राज्य सरकारकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक युवकाच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून, जखमी झालेल्या युवकांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.
या दु:खद घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात शोककळा पसरली असून, जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक मदत तातडीने पुरवली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली असून, संबंधित यंत्रणांना तत्काळ मदत व उपचाराची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #accident #GadchiroliAccident #RoadSafety #TeenagersKilled #HitAndRun #NH353C #GadchiroliNews #MaharashtraNews #TragicAccident #PublicOutrage #TrafficControl #PoliceAction #HighwaySafety #SpeedingTruck #ChildVictims #RuralNewsIndia
#गडचिरोलीअपघात #आरमोरीमार्ग #बालकांचा मृत्यू #भीषणअपघात #राष्ट्रीयमहामार्ग #मालवाहू ट्रक #गतीमर्यादा #पोलीसकारवाई #वाहतूकनियंत्रण #जनक्षोभ #गडचिरोली_बातमी #महाराष्ट्रवृत्त #अपघातग्रस्त #रस्ता_सुरक्षा #तणावाचे_वातावरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here