गडचिरोली : “साहेब, हेलिकॉप्टरने या चालेल… पण गावात या”
– गडचिरोलीत २६ जूनला काँग्रेसचं अनोखं आंदोलन, अधिकाऱ्यांना ‘हेलिकॉप्टर भेट’ देत गल्लोगल्ली जाण्याची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन वर्षांपासून जिल्ह्याचा विकासकारभार असला तरी, प्रत्यक्षात स्थानिक जनतेच्या समस्या अधिकच गंभीर होत चालल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेसकडून उद्या २६ जून रोजी ‘हेलिकॉप्टर घ्या, पण गावात या!’ या घोषवाक्याने आंदोलन छेडण्यात येत आहे.
हे आंदोलन २६ जून रोजी, दुपारी २ वाजता, इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे होणार असून, यामध्ये शेतकरी, महिला, तरुण, बेरोजगार आणि सामान्य नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.
शेतीचे नुकसान, रानटी हत्तींचा त्रास, सुरजागड खाणीतून होणारे अपघात, दयनीय रस्त्यांची अवस्था, विद्यार्थी वाहतुकीच्या सुविधा नाहीशा, घरकुलासाठी रेतीचा अभाव, मनरेगाची रखडलेली देयके, सतत खंडित होणारी वीज, बेरोजगारीचा भस्मासूर, जमिनींचे जबरदस्ती अधिग्रहण… आणि त्याहूनही मोठं दुःख म्हणजे – या साऱ्यांकडे कोणाचंच लक्ष नाही.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, पालकमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी केवळ ‘हेलिकॉप्टर दौऱ्यांपुरतेच’ जिल्ह्यात येतात, प्रत्यक्षात लोकांच्या गावी, तालुक्यांमध्ये, समस्यांच्या केंद्रबिंदूंमध्ये कोणीच जात नाही. कार्यालयात गेले तरी ‘साहेब व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आहेत’ असं सांगून नागरिकांना परत पाठवण्यात येतं.
या निष्क्रियतेच्या विरोधात काँग्रेसकडून एक प्रातिनिधिक कृती म्हणून आंदोलनस्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना ‘हेलिकॉप्टर भेट’ देण्यात येणार आहे – जेणेकरून “हेलिकॉप्टरने आलात तरी चालेल… पण एकदा तरी गावा-तालुक्यांत या, लोकांच्या समस्या ऐका” हा संदेश पोहोचवता येईल.
“गडचिरोली जिल्ह्याचा विकास कागदावर आहे, जमिनीवर नाही. हे बदलण्यासाठी प्रशासकांनी गडचिरोलीच्या मातीला स्पर्श करावा, वातानुकूलित दालनांमधून बाहेर यावं. हेच आम्ही या आंदोलनातून सांगणार आहोत,” असं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews
#गडचिरोलीकरांचाआवाज #हेलिकॉप्टरघ्यापणगावातया #साहेबजमिनीवरया #जनतेचीदुखःऐका #गडचिरोलीमागतेउत्तर
#DevelopmentOnPaperOnly #वीसीपुरतेसाहेब #DistrictInDistress #CongressProtestGadchiroli #PeopleVsPower #AdminWakeUp #FieldNotFiles
#OnlyHelicopterNoHearing #GroundRealityIgnored
#26JuneProtest