गडचिरोली : “पदभरती प्रक्रिया पारदर्शक, कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नका”

2425

– मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : “जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत सरळसेवा व अनुकंपा तत्वावरील पदभरती ही शासन निर्णयानुसार पूर्णतः पारदर्शक आणि प्रामाणिक पद्धतीने राबवली जात आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही दलाल, मध्यस्थ अथवा खोट्या आश्वासनांना बळी पडू नये,” असे स्पष्ट आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
गट-क व गट-ड मधील रिक्त पदे सरळसेवा, पदोन्नती व बदली प्रक्रियेद्वारे भरली जातात. तसेच, अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना आवश्यक दस्तऐवज तपासणीसाठी बोलावले जाते. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शैक्षणिक पात्रता, उपलब्ध जागा आणि ज्येष्ठतेनुसार पारदर्शक समुपदेशनाच्या माध्यमातून नियुक्त्या दिल्या जातात, असेही गाडे यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेबाबत काही अपप्रचार व अफवा पसरवल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन करत उमेदवारांनी अधिकृत सूचना व आदेशांवरच विश्वास ठेवावा, असेही सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here