– जिल्हाभरात 3000 पेक्षा अधिक पोलिसांचा सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने जिल्हा स्तरावर सामूहिक योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यक्रम पोलिस मुख्यालय गडचिरोली येथे सकाळी 6.30 वाजता पार पडला. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये, पोलिस ठाणे, उपठाणे आणि पोमके येथे देखील योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
गडचिरोली पोलिस मुख्यालयातील शिबिरात विशेष अभियान पथक, राज्य राखीव पोलिस बल आणि अन्य शाखांतील 1000 हून अधिक पोलिस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले. प्राणहिता येथील उप-मुख्यालयात झालेल्या शिबिरात सुमारे 500 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्हाभरातील शिबिरांमध्ये मिळून सुमारे 3000 पोलिसांनी योगाभ्यास केला.
योग प्रशिक्षक संतोष वेखंडे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना योगाचे विविध प्रकार शिकवले. योगासनांचे आरोग्यदायी फायदे, मानसिक संतुलन आणि तणावमुक्त जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी शिबिरात मार्गदर्शन करताना सांगितले की, शरीर आणि मन सशक्त ठेवण्यासाठी योग हा प्रभावी मार्ग आहे. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन दिनचर्येतून कमीत कमी 20 मिनिटे योगासाठी द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमात अतिरिक्त पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अतिरिक्त पोलिस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप, पोलिस उपअधीक्षक विशाल नागरगोजे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पोलिस मुख्यालयाचे रापोनि. अनुजकुमार मडामे, पोलिस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पिवाल आणि जिल्ह्यातील सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी यांनी योगदान दिले.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #yoga_day #yogaday