– 70 कुटुंबांची नोंदणी, 72 जणांची मोफत वैद्यकीय तपासणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : माओवादी प्रभावग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील शहीद पोलिस जवानांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य रक्षणासाठी गडचिरोली पोलिस दल आणि सहयोग हॉस्पिटल, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शहीद सैनिक आश्रित कुटुंब आरोग्य कल्याण योजना’ नोंदणी व वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पोलिस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे पार पडलेल्या या शिबिरात 70 शहीद जवानांच्या कुटुंबांचे नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये त्यांच्या आई-वडील, पत्नी आणि 18 वर्षाखालील मुलांना मोफत ओपीडी, आयपीडी, शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहेत.
या उपक्रमात 72 कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्डिओलॉजी, न्युरोलॉजी, पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी यासह विविध आधुनिक विभागांमार्फत सेवांचा लाभ मिळणार आहे.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात राबवलेल्या या उपक्रमात डॉ. सुनिल मडावी (पोलिस रुग्णालय, गडचिरोली), डॉ. विश्वेश्वर विरुळकर (सहयोग हॉस्पिटल, गोंदिया), तसेच पोलिस दलाच्या विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
या पुढेही शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी असे उपक्रम राबवले जातील, तसेच इतर रुग्णालयांसोबत सामंजस्य करार करण्याचेही प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिस दलाकडून देण्यात आली.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews