गडचिरोली : ‘लहानग्यांच्या हातात दुचाकी’ पालकांना पडली महागात, २४ जणांविरुद्ध गुन्हे

866

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : शहरातील वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी कठोर पावले उचलली असून, अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यास देणाऱ्या २४ पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
२९ जून व ३ जुलै रोजी गडचिरोली शहरात ५ ठिकाणी राबवलेल्या नाकाबंदी मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. या दरम्यान, अनेक अल्पवयीन मुले परवाना नसताना दुचाकी चालवत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पालकांनी कायद्याचे उल्लंघन करून अल्पवयीन मुलांना दुचाकी दिल्यामुळे, मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ चे कलम १९९(अ) अंतर्गत २४ पालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. संबंधित वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
या कायद्यानुसार, अल्पवयीन मुलांकडून वाहतूक कायद्याचे उल्लंघन झाल्यास वाहन मालक किंवा पालकास ३ वर्षांपर्यंत कारावास, ₹२५,००० दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. तसेच संबंधित अल्पवयीन मुलावरही बाल न्याय अधिनियम २०१५ अंतर्गत खटला चालवला जाऊ शकतो.
या मोहिमेच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, “शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. पालकांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून मुलांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगावे.” यापुढे अशा प्रकारच्या बेजबाबदार वर्तनावर अधिक तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक गोकुळ राज जी., उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, गडचिरोली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण, वाहतूक शाखेचे सपोनि. शरद मेश्राम आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews
#गडचिरोली #अल्पवयीनचालक #पालकगुन्हेगार #पोलीसकारवाई #वाहतूकशिस्त #MotorVehicleAct

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here