गडचिरोली : संघर्षाच्या छायेतून हरित पर्यटनाच्या नव्या वाटा

53

जागतिक पर्यटन दिन विशेष – (२७ सप्टेंबर )

गडचिरोली : संघर्षाच्या छायेतून हरित पर्यटनाच्या नव्या वाटा

गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर नेहमीच एका वेगळ्या कारणासाठी ओळखला जातो. नक्षलवादाचा प्रभाव, जंगलातील संघर्ष, खनिज व खाणींशी संबंधित प्रश्न, तसेच सतत दहशतीत जगणाऱ्या समाजाचं चित्रण हेच माध्यमांमध्ये अधोरेखित झालं आहे. परिणामी “लाल कॉरिडॉर” अशी जिल्ह्याची प्रतिमा जगापुढे उभी राहिली. मात्र या प्रतिमेपलीकडे गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वनसंपन्न जिल्हा असून, नैसर्गिक पर्यटन आणि हरित विकासाचा खरा मॉडेल होऊ शकतो. जिल्ह्यात आढळणाऱ्या अडीचशेहून अधिक औषधी वनस्पती, नद्या, धबधबे, प्राचीन किल्ले आणि समृद्ध आदिवासी संस्कृती यांच्या आधारे गडचिरोलीला “ग्रीन कॉरिडॉर” म्हणून नवी ओळख निर्माण करण्याची क्षमता आहे.

भौगोलिक व नैसर्गिक पार्श्वभूमी

महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात वसलेला गडचिरोली जिल्हा जवळपास ७८ टक्के जंगलांनी व्यापलेला आहे. सुमारे पाच लाख हेक्टर जंगल क्षेत्रामध्ये साग, बांबू, तेंदू, हिरडा यांसारख्या मौल्यवान प्रजाती विपुल प्रमाणात आढळतात. वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती आणि गोदावरी अशा नद्यांनी हा प्रदेश जलसंपन्न आहे. चपराळा अभयारण्य, राज्यातील एकमेव कमलापूर हत्ती कॅम्प, टीपागड किल्ला, वैरागड किल्ला, मार्कंडा देवस्थान, वडधम फॉसिल पार्क, बिनागुंडा धबधबा आणि वनवैभव आलापल्ली यांसारखी स्थळे नैसर्गिक व ऐतिहासिक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. या नैसर्गिक संपत्तीमुळे गडचिरोलीला महाराष्ट्रातच नव्हे तर देशात “इको-टुरिझम हब” बनण्याची क्षमता आहे.

विद्यमान पर्यटन परिस्थिती

महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या २०२३-२४ च्या आकडेवारीनुसार गडचिरोलीला सुमारे ४.८ लाख पर्यटकांनी भेट दिली. मात्र त्यातील सुमारे ८० टक्के पर्यटक हे स्थानिक किंवा आसपासच्या जिल्ह्यांतील होते. राज्याबाहेरून आलेल्यांची संख्या अवघी १५ टक्के आणि परदेशी पर्यटकांची संख्या तर अत्यल्प होती. यावरून स्पष्ट होतं की जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेचा पुरेपूर उपयोग अद्याप झालेला नाही. चंद्रपूर किंवा गोंदिया जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोलीत पर्यटकांचा मुक्काम कालावधी लक्षणीयरीत्या कमी आहे. त्याची मुख्य कारणे म्हणजे रस्त्यांची दयनीय अवस्था, पाणी व स्वच्छता सुविधांचा अभाव, डिजिटल प्रमोशनचा अभाव आणि पर्यटन धोरणामध्ये सातत्याचा अभाव.

पायाभूत सुविधांची कमतरता

जिल्ह्यातील पंधरा प्रमुख पर्यटन स्थळांपैकी अकरा ठिकाणी जाणारे रस्ते अजूनही मोसमावर अवलंबून आहेत. पावसाळ्यात हे रस्ते बंद होतात किंवा अत्यंत धोकादायक ठरतात. अनेक ठिकाणी आजही पर्यटकांना पायवाटेवरून चालत जावं लागतं. पर्यटकांची पहिली अपेक्षा म्हणजे सुरक्षित आणि सोयीस्कर रस्ते. पण गडचिरोलीत ती सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक पर्यटक जिल्ह्यात येण्यास कचरत आहेत.

पाणीपुरवठा आणि स्वच्छता सुविधांची परिस्थितीही गंभीर आहे. उन्हाळ्यात जिल्ह्यातील आठ तालुके टँकरवर अवलंबून राहतात. पर्यटन स्थळांवर सार्वजनिक शौचालयांचा अभाव असल्याने कुटुंबं दीर्घकाळ थांबण्यास टाळाटाळ करतात. परिणामी गडचिरोलीत पर्यटकांचा मुक्काम केवळ सहा-सात तासांचा राहतो, तर चंद्रपूर किंवा गोंदियासारख्या जिल्ह्यांत तो दोन-तीन दिवसांचा असतो.

महोत्सवांचे वास्तव

जिल्ह्यात पर्यटनाशी संबंधित महोत्सव आयोजित केले जातात. यंदा २३ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या “पर्यटन परिवर्तन महोत्सवा”द्वारे गडचिरोलीला हरित पर्यटन केंद्र म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंच, प्रकाशयोजना, नृत्यप्रदर्शन, फॅशन शो अशा उपक्रमांमुळे जिल्ह्याची संस्कृती रंगतदार पद्धतीने मांडली जाते. मात्र या महोत्सवांची खरी मर्यादा म्हणजे त्यातून स्थानिकांना दीर्घकालीन फायदा कितपत होतो हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

स्थानिक कलाकारांना दिला जाणारा मोबदला साधारण ५०० ते १००० रुपयांच्या दरम्यान असतो, तर त्याच कार्यक्रमासाठी बॅनरबाजी आणि प्रकाशयोजनेवर लाखो रुपये खर्च होतात. महोत्सव बहुधा केवळ एक “शोकेस इव्हेंट” ठरतो; स्थानिक रोजगार किंवा पर्यटनाला त्यातून फारसा हातभार लागत नाही. महोत्सवामुळे गडचिरोली एक दिवसासाठी चर्चेत येतो, पण दुसऱ्याच दिवशी तेच प्रश्न पुन्हा उभे राहतात रस्त्यांची अवस्था, स्वच्छतेचा अभाव, राहण्याची सोय नसणे.

रोजगाराच्या संधी आणि मर्यादा

पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार गडचिरोलीत केवळ काहीच नोंदणीकृत पर्यटन मार्गदर्शक आहेत. दरवर्षी सुमारे तीन हजार तरुण रोजगाराच्या शोधात स्थलांतर करतात. अशा परिस्थितीत “पर्यटन गाव” संकल्पना जाहीर करूनही प्रत्यक्षात फारसा बदल दिसून येत नाही. पण जर पर्यटनाची खरी ताकद उलगडली गेली, तर गडचिरोलीतील हजारो तरुणांना आपल्या गावातच स्थिर रोजगार मिळू शकतो.

इको-टुरिझम : शाश्वत विकासाचा मार्ग

गडचिरोलीच्या विकासासाठी “इको-टुरिझम” हा सर्वात शाश्वत मार्ग आहे. जंगलभ्रमण मार्गांवर स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन इको-गाईड म्हणून नियुक्त केलं, तर दरवर्षी किमान पाचशे युवकांना रोजगार मिळू शकतो. गावोगावी होमस्टे सुरू झाले, तर प्रत्येक गावात वीस ते पंचवीस लोकांना स्थिर रोजगार निर्माण होईल. पन्नास गावांनी हा उपक्रम राबवला, तर हजाराहून अधिक रोजगार निर्माण होतील. स्थानिक हस्तकला, झाडीपाटी नाट्य, आदिवासी खाद्यसंस्कृती यांना पर्यटनाच्या मुख्य प्रवाहात आणलं, तर ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल.

डिजिटल प्रसार व आंतरराष्ट्रीय जोड

आज गडचिरोलीसाठी एकही अधिकृत शासकीय पर्यटन वेबसाइट किंवा बुकिंग अ‍ॅप उपलब्ध नाही. अशा अ‍ॅपद्वारे होमस्टे, स्थानिक गाईड, सांस्कृतिक कार्यक्रम थेट बुकिंगसाठी उपलब्ध झाले, तर बाहेरच्या राज्यांतून व परदेशातून येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतील. सोशल मीडियावर आणि जागतिक पर्यटन प्रदर्शनांमध्ये गडचिरोलीचं योग्य सादरीकरण झालं, तर “Red Corridor” ही प्रतिमा बदलून “Green Corridor” म्हणून नवी ओळख निर्माण होईल.

जागतिक अनुभव : संघर्षातून पर्यटनाकडे

जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे संघर्षग्रस्त प्रदेशांनी पर्यटनाच्या माध्यमातून नवी ओळख मिळवली आहे. कोलंबियाने दशकानुदशके चाललेल्या गनिमी युद्धानंतर इको-टुरिझमचा मार्ग स्वीकारला. रवांडाने गृहयुद्धानंतर गोरिल्ला टुरिझममुळे आपली अर्थव्यवस्था उभी केली. नेपाळात कम्युनिटी-बेस्ड ट्रेकिंग मार्गांनी ग्रामीण समाजाला आर्थिक स्थैर्य दिलं. गडचिरोलीसाठी हे अनुभव प्रेरणादायी ठरू शकतात.

गडचिरोली जिल्ह्याला निसर्गाने अफाट संपत्ती दिली आहे. मात्र आजवरच्या धोरणांमुळे आणि नकारात्मक प्रतिमेमुळे या संपत्तीचा योग्य उपयोग झालेला नाही. पर्यटन परिवर्तन महोत्सव ही एक चांगली सुरुवात आहे, पण ती फक्त रंगीबेरंगी मंचापुरती न राहता खऱ्या अर्थाने शाश्वत परिवर्तनाची दिशा ठरावी.

पायाभूत सुविधा, डिजिटल प्रसार, स्थानिक रोजगार, संस्कृतीचं सशक्तीकरण आणि पर्यावरणपूरक दृष्टी या पाच आधारस्तंभांवर गडचिरोलीचं पर्यटन उभारलं, तर हा जिल्हा जगापुढे “लाल कॉरिडॉर” म्हणून नव्हे, तर “हरित कॉरिडॉर” म्हणून उभा राहील.

— स्वाधिनता बाळेकरमकर
संचालिका अरण्यम इको टूर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here