गडचिरोली : भाजप नेते व माजी जि.प. अध्यक्षाच्या घरातून दारूसाठा जप्त
– निवडणुकीआधी भाजप अडचणीत
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : जिल्ह्यातील राजकीय वातावरणाला हादरा देणारी घटना उघडकीस आली आहे. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात भाजप नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरातून पोलिसांनी तब्बल ४५ पेट्या देशी दारू जप्त करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
ही कारवाई चामोर्शी पोलिसांनी मंगळवारी पहाटे वालसरा (ता. चामोर्शी) येथील भाजप युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता मधुकर भांडेकर यांच्या निवासस्थानी केली.
या छाप्यात देशी दारूच्या ४५ पेट्या जप्त करण्यात आल्या असून, दारूबंदी कायद्यानुसार मधुकर भांडेकर यांचे बंधू आणि भाजप युवा आघाडीचे तालुका उपाध्यक्ष रामचंद्र केशव भांडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कारवाईने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजवली आहे.
“मतदारांना आकर्षित करण्यासाठीच का हा दारूचा साठा ठेवण्यात आला होता?” असा प्रश्न स्थानिकांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सोशल मीडियावरही या घटनेबाबत संताप व्यक्त होत असून, नागरिकांकडून टीकेची झोड उठली आहे.
दारूबंदी जिल्ह्यात भाजप नेत्यांच्या घरीच दारू सापडणे म्हणजे “कायद्याचा सरळ अवमान आणि जनतेची फसवणूक,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक व विरोधकांकडून व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे भाजपला निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














