गडचिरोली : हिंसाचारातून शांततेकडे प्रवास, आत्मसमर्पित माओवादी दाम्पत्याला पुत्ररत्न
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : पोलीस दलाच्या पुनर्वसन उपक्रमाला आज मोठे यश मिळाले असून, आत्मसमर्पण केलेल्या माओवादी दाम्पत्याच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण उजाडला आहे. 01 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्जुन ऊर्फ सागर ऊर्फ सुरेश तानू हिचामी (डिव्हीसीएम, राही दलम) आणि त्याची पत्नी सम्मी ऊर्फ बंडी पांडू मट्टामी (एसीएम, डिके झोन डॉक्टर टीम) यांनी आत्मसमर्पण केले होते. आज जिल्हा महिला सामान्य रुग्णालयात सम्मी हिची प्रसूती होऊन दाम्पत्यास पुत्ररत्न प्राप्त झाले.
दलममध्ये असताना सततच्या स्थलांतर, भीती आणि हिंसाचाराच्या छायेत साधे कौटुंबिक आयुष्यही या दाम्पत्याला अशक्य होते. मात्र आत्मसमर्पणानंतर गडचिरोली पोलिसांनी प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करत त्यांना नव्या जीवनाची दिशा दिली. या अंतर्गत दाम्पत्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, ई-श्रम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असे सर्व मूलभूत दस्तऐवज मिळवून देण्यात आले. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाकडून पुनर्वसनासाठी एकूण 16.3 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
2005 पासून सुरू असलेल्या शासनाच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत गडचिरोलीत आतापर्यंत 783 माओवादी सदस्यांनी हिंसक जीवनाला रामराम करत शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. यापैकी 2025 मध्येच 101 माओवादी आत्मसमर्पित झाले असून, पोलिस दलाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे मोठे फलित मानले जात आहे.
अर्जुन आणि सम्मी यांच्या कुटुंबात आज उगवलेला हा आनंदाचा सूर्य त्यांच्या नव्या आयुष्याची आशादायी सुरुवात आहे. हिंसाचाराच्या सावटातून बाहेर पडून समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थिरपणे उभे राहण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने दाखविलेली बांधिलकी या दाम्पत्याच्या पुनर्वसनातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दाम्पत्यास भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या नव्या प्रवासाला सुरक्षित, शांततामय आणि सुखसमाधानी जीवन लाभावे अशी कामना व्यक्त केली.














