– चारचाकी वाहन जप्त, आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ७ : दारुबंदी लागू असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या देशी व विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीच्या पथकाने आलापल्ली येथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 8 लाख 69 हजार 400 रुपयांचा अवैध दारूचा साठा आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून, एक आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेला काही व्यक्ती चारचाकी वाहन क्रमांक एमएच 20 ईजे 5272 द्वारे आलापल्ली परिसरात दारूची वाहतूक करणार आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली असता त्यानुसार सावरकर चौक, आलापल्ली येथे सापळा रचण्यात आला. काही वेळाने संशयास्पद वाहन भरधाव येताना दिसताच पोलिसांनी ते थांबवून तपासणी केली. वाहनचालकाने आपले नाव पंकज अशोक शर्मा (रा. चंद्रपूर) असे सांगितले.
पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रचंड प्रमाणात देशी व विदेशी दारूचा साठा आढळून आला. त्यात संत्रा देशी दारूचे 31 बॉक्स (2 लाख 48 हजार रुपये), रॉयल स्टॅग व्हिस्कीचे 7 बॉक्स (1 लाख 47 हजार रुपये), हेवर्ड बियरचे 14 बॉक्स (1 लाख 800 रुपये), ऑफिसर चॉईस व्हिस्कीच्या 2 पेट्या (42 हजार रुपये), ट्यूबर्ग बियरचे 3 बॉक्स (21 हजार 600 रुपये) असा एकूण 5 लाख 59 हजार 400 रुपयांचा अवैध दारूचा साठा मिळाला. याशिवाय अवैध दारूच्या वाहतुकीसाठी वापरलेले चारचाकी वाहन (3 लाख रुपये) आणि रेडमी मोबाईल फोन (10 हजार रुपये) असा एकूण 8 लाख 69 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत आरोपी पंकज शर्माने कबुली दिली की, त्याने सुलतान शेख (रा. चंद्रपूर) याच्यासह किशोर डांगरे आणि पप्पी झोरे (दोघे रा. आलापल्ली) यांच्या सांगण्यावरून दारू आणल्याचे सांगितले. त्यावरून पोस्टे अहेरी येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ), 98(2), 83 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपी पंकज शर्मा याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांनी केले. त्यांना स.पो.नि. भगतसिंग दुलत व चापोशी दीपक लोणारे यांनी सहकार्य केले. ही मोहीम अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या धडक कारवाईमुळे आलापल्ली परिसरातील अवैध दारू वाहतूक रॅकेटला मोठा धक्का बसला असून, पुढील तपास स.पो.नि. देवेंद्र पटले (पोस्टे अहेरी) हे करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews














