– अवैधरित्या दारु तस्करांचे धाबे दणाणले
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध देशी दारूचा साठा आणि चारचाकी वाहन असा एकूण २० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
२१ मे रोजी झिंगानूर परिसरात राहणाऱ्या कारे कोरके गावडे (वय 38) याच्या घरी छापा टाकून पोलिसांनी संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या १२,४०० सीलबंद बाटल्या, ज्याची किंमत १२ लाख ४० हजार रुपये आहे, असा साठा जप्त केला. त्यानंतर अधिक चौकशी केली असता, या दारूचा संबंध समया बापू दुर्गम आणि सडवली बापू दुर्गम या दोघांशी असल्याचे समोर आले.
पोलिसांनी त्यांच्या घरी धाड टाकली असता, ते पळून गेले. मात्र, घराजवळ उभ्या असलेल्या महिंद्रा बोलेरो वाहनातून ४,८०० बाटल्या (किंमत ४ लाख ८० हजार रुपये) आणि अंदाजे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे चारचाकी वाहन असा साठा सापडला. पोलिसांनी मिळून आलेला एकूण २० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी कारे कोरके गावडे याला अटक करण्यात आली असून समया दुर्गम, सडवली दुर्गम आणि पुरवठादार रुपेश कांरेगला (रा. देचलीपेठा, अहेरी) हे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी झिंगानूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईत उपपोस्टे झिंगानूरचे पोउपनि. अभिजीत घोरपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
गडचिरोली पोलिसांची ही कारवाई जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांसाठी मोठा इशारा ठरली आहे.
