– CCMP डॉक्टरांच्या नोंदणीसाठी ‘होमिओपॅथी स्वाभिमान आंदोलन’
The गडविश्व
गडचिरोली, दि.१४ : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक आणि ज्येष्ठ होमिओपॅथिक डॉक्टर डॉ. बाहुबली शहा यांनी सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांच्या हक्कासाठी १६ जुलैपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. या ऐतिहासिक उपोषणाला गडचिरोली जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी एकमुखी पाठिंबा दिला असून, सोमवारी इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यात आली.
डॉ. शहा यांच्या म्हणण्यानुसार, सीसीएमपी (Certificate Course in Modern Pharmacology) हा अभ्यासक्रम महाराष्ट्र विधानमंडळाने एकमताने संमत केलेला असून, तो संपूर्णपणे कायदेशीर व शासनमान्य आहे. या अभ्यासक्रमात आधुनिक औषधशास्त्राचा क्लिनिकल रोटेशनसह समावेश असून, २०१७ पासून हजारो होमिओपॅथिक डॉक्टरांनी तो पूर्ण केला आहे. या प्रशिक्षणाच्या आधारे ते आधुनिक वैद्यकीय उपचारासाठी सक्षम आहेत, असा ठाम दावा करण्यात आला.
मात्र इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) या डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेतील (MMC) नोंदणीस विरोध करत, प्रसारमाध्यमे व आंदोलनांच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवून शासनावर दबाव आणल्याचा आरोप डॉ. शहा यांनी केला आहे. त्यांनी यास विरोध दर्शवून “होमिओपॅथी स्वाभिमान आंदोलन” सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या आंदोलनाची माहिती निवेदनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहे.
IMAने सीसीएमपीविरोधातील खटले उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होते, मात्र हे सर्व प्रयत्न न्यायालयाने फेटाळले असून, तरीही MMC नोंदणीबाबत होत असलेली टाळाटाळ ही डॉक्टरांच्या स्वाभिमानाला जबर धक्का असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला डॉ. तामदेव दुधबळे, डॉ. वरुण राव दूधबळे, डॉ. सत्यविजय दूधबळे, डॉ. गणेश सातपुते, डॉ. संदीप भांडेकर, डॉ. सुशील शेंडे, डॉ. अंचित विश्वास, डॉ. कमलाकर रोडे, डॉ. आर. डी. मुनघाटे, डॉ. के. व्ही. कोहळे, डॉ. प्रणित बॅनर्जी, डॉ. संदीप ठाकरे, डॉ. प्रमोद धोडरे, डॉ. मिथुन रायसिडाम, डॉ. रवींद्र पाछळ, डॉ. रवी बुर्लावार आदी उपस्थित होते.
गडचिरोलीतील डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की, “हा केवळ हक्काचा नाही, तर आत्मसन्मानाचा लढा आहे – आणि तो आम्ही संपादन केल्याशिवाय थांबणार नाही.”

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolice #होमिओपॅथीस्वाभिमानआंदोलन #डॉबाहुबलीशहा#CCMPDoctors #IMAविरोध
#MMCनोंदणीविवाद #गडचिरोलीDoctorSupport
#आझादमैदानउपोषण #MedicalJustice #HomoeopathyRights #डॉक्टरांचा_स्वाभिमान
#होमिओपॅथीस्वाभिमानआंदोलन #CCMPDoctors #DrBahubaliShah #IMAविरोध #गडचिरोलीDoctorSupport