गडचिरोली : हरिणाच्या मासांवर ‘वनविभागीय मेजवानी’ ? उपवनसंरक्षक तलमले यांची कारवाई

22

– खळबळजनक खुलासे अपेक्षित
The गडविश्व
गडचिरोली – आलापल्ली, दि. १० : मौलवान व दुर्मीळ सागवानासाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या आलापल्ली वनविभागातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागेपल्ली येथील वनविकास महामंडळाच्या कॉलनीत वनकर्मचारीच हरणाचं मांस शिजवत असल्याचं समोर आलं असून, उपवनसंरक्षक दीपाली तलमले यांच्या धडक कारवाईत दोन कर्मचारी रंगेहाथ पकडले गेले.
९ जुलै रोजी रात्री हरणाची शिकार करून मांस काही कर्मचाऱ्यांत वाटले गेले आणि घरी शिजवले जात होते. याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर, उपवनसंरक्षक तलमले यांनी अहेरी वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांसह रात्री ८ वाजताच्या सुमारास नागेपल्ली कॉलनीत धाड टाकली. या वेळी दोन कर्मचाऱ्यांकडे हरणाचे शिजवलेले मांस सापडले असून ते दोघे ताब्यात घेतले गेले आहेत.
या कारवाईने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात कॉलनीतील आणखी दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे.
विशेष म्हणजे, उपवनसंरक्षक दीपाली तलमले यांनी अवघ्या दहा दिवसांपूर्वीच आलापल्ली येथे कार्यभार स्वीकारला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच मोठी कारवाई झाली आहे.
दरम्यान, नेमक्या किती घरांमध्ये मांस वाटले गेले आणि किती कर्मचाऱ्यांचा या शिकारीत सहभाग होता, याचा शोध सुरू आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार ही शिकार गंभीर गुन्हा ठरतो.
‘कायद्याचे रक्षकच भक्षक बनले’ असा संतप्त सूर स्थानिकांमध्ये व्यक्त होत असून, या प्रकरणात आणखी मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #forest #gadchiroliforest #crimenews
#गडचिरोली #आलापल्ली #वनविभाग #हरीणशिकार #वन्यजीवसंरक्षण #वनकर्मचारी #दीपालीतलमले #शिकारीचा पर्दाफाश #वनअपराध #BreakingNews #MaharashtraForest #WildlifeCrime #NaxalAreaNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here