गडचिरोली : लाच प्रकरणातील एसडीओवरून वाद, करपाडा रेती मंजुरीविरोधात आंदोलन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : लाच प्रकरणात अटक झालेल्या उपविभागीय अधिकारी (एसडीओ) प्रसेनजीत प्रधान यांच्या पुनर्नियुक्तीवरून गडचिरोली जिल्ह्यात वादंग निर्माण झाले असून, आरमोरी तालुक्यातील करपाडा चक येथील रेती निष्कासन मंजुरीविरोधात सूरज हजारे यांचे
बेमुदत आंदोलन सुरू झाले आहे.
२०२२ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे क्रशर प्रकरणात प्रधान यांना ५.५ लाख रुपयांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. त्यानंतर त्यांची गडचिरोली येथे अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली होती. मात्र सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांची देसाईगंज (वडसा) येथे एसडीओ पदी पुनर्नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान, करपाडा चक येथील सर्व्हे क्र. १५७/१ (३.८८ हेक्टर) क्षेत्रातून रेती निष्कासनास मंजुरी देण्यात आल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आंदोलनकर्ते सुरज अशोक हजारे यांनी संबंधित जमीन मृत खातेदारांच्या नावावर असल्याचा, भूजल सर्वेक्षण अहवालात ३७ हजार ब्रास रेती दाखवण्यात विसंगती असल्याचा आणि प्रस्तावाला संशयास्पद गती मिळाल्याचा आरोप केला आहे. तक्रारदारांना माहिती न देता प्रस्ताव पुढे ढकलण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर देसाईगंज एसडीओ कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू असून, चौकशीची मागणी करण्यात येत आहे. विरोधी पक्षांनीही या प्रकरणाची विधानसभेत चर्चा करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. दरम्यान या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा पाठिंबा वाढत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














