The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : गडचिरोली शहरातील रस्ते, नाले, वाहतूक, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक ठिकाणांची दुरवस्था यामुळे नागरिक त्रस्त असून, या सर्व समस्या तातडीने सोडवाव्यात अशी जोरदार मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे. आज, बुधवार १६ जुलै रोजी पक्षाच्या शिष्टमंडळाने नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी काटकर यांची भेट घेऊन या समस्या आणि मागण्यांचे निवेदन सादर केले.
शहरातून जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने वारंवार अपघात होत असून रिंगरोडद्वारे ही वाहतूक शहराबाहेर वळवण्याची गरज असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. तसेच भूमिगत गटार योजना पूर्ण न झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून काम तत्काळ कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेक मुख्य रस्ते अरुंद झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण, पक्के नाले, ओपन स्पेसवर दुर्लक्ष, डासांचा त्रास, मोकाट जनावरे, वाचनालयांची अनुपलब्धता यामुळे शहरातील जीवनमान ढासळले आहे.
शहराच्या विविध वसाहतींमध्ये रस्ते, वीज, पिण्याचे पाणी अशा मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्यीकरण करून तेथे नागरिकांना बसण्यासाठी व व्यायामाची सोय उपलब्ध करून द्यावी, तसेच संविधान अमृतमहोत्सवानिमित्त शहराच्या मुख्य चौकात संविधान प्रस्ताविकेचा भव्य स्तंभ उभारण्यात यावा, अशाही मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, विधानसभा अध्यक्ष प्रदीप भैसारे, नरेंद्र रायपुरे, वनमाला झाडे, कविता रामटेके, सुखदेव वासनिक आदी कार्यकर्ते सहभागी होते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने तातडीने कृती करावी, अशी तीव्र मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #GadchiroliIssues #CivicProblems #RepublicanParty #UrbanDevelopment #MunicipalDemands #PublicInfrastructure #CityCleanliness #BasicAmenities #RoadWidening #DrainageCrisis #ConstitutionPillar #CivicAction #GadchiroliNews #गडचिरोलीसमस्या #नागरिकतक्रार #रिपब्लिकनपक्ष #नगरपरिषद #शहरविकास #मूलभूतसुविधा #रस्ते #नाले #स्वच्छता #अतिक्रमणहटवा #सामाजिककार्य #गडचिरोलीबातमी