गडचिरोली : अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठी निलंबित
– जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई, तहसीलदार निलेश होनमोरेवर बदलीची शिफारस
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : सिरोंचा तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि गौण खनिज वाहतुकीच्या प्रकरणी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महसूल विभागातील तिघांवर धडक कारवाई केली आहे. तहसीलदार निलेश होनमोरे यांच्यावर नियंत्रण न ठेवल्याबद्दल कारवाई करून बदलीची शिफारस विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांच्याकडे करण्यात आली असून, मंडळ अधिकारी राजू खोब्रागडे व तलाठी कु. अश्विनी सडमेक यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
माध्यमांतून सिरोंचा तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू असल्याच्या आणि महसूल यंत्रणेकडून नियंत्रण न ठेवल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी (अहेरी) यांना चौकशीचे आदेश दिल्यानंतर २ ऑक्टोबर रोजी मद्दीकुंठा व चिंतरेवला येथील रेतीघाटांवरील मौका चौकशीत तब्बल १५,६६५ ब्रास अवैध रेती साठा आढळून आला. या प्रकरणात तब्बल २९ कोटी रुपयांपेक्षा अधिक दंडाची रक्कम प्रस्तावित करण्यात आली असून २ जेसीबी, १ पोकलँड व ५ ट्रक रेती उत्खननासाठी वापरले जात असल्याचे निष्पन्न झाले.
महसूल कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार होनमोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून बदलीची शिफारस केली. तर मंडळ अधिकारी राजू खोब्रागडे आणि तलाठी अश्विनी सडमेक यांनी रेतीघाटाची पाहणी व नोंदी ठेवण्यात निष्काळजीपणा दाखविल्याने १५ ऑक्टोबर रोजी तात्काळ निलंबनाचे आदेश देण्यात आले.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी“अवैध रेती उत्खननाबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका कायम राहील. महसूल यंत्रणेतील कुणीही अधिकारी अथवा कर्मचारी निष्काळजी राहिला, तर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.” असा स्पष्ट इशारा दिला आहे.
या निर्णयामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्यातील वाळू माफियांना आळा बसण्याची चिन्हे दिसत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #sironcha #गडचिरोली #अवैधरेंतीउत्खनन #महसूलकारवाई #जिल्हाधिकारीअविश्यांतपंडा #सिरोंचा














