गडचिरोली : दिवाळी फटाका विक्रीसाठी तात्पुरत्या परवान्यासाठी अर्ज करा
– जिल्हा प्रशासनाचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात फटाक्यांच्या तात्पुरत्या साठवणूक व विक्रीसाठी परवाने देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुकांनी आपले अर्ज 10 ऑक्टोबर 2025 पूर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालयात विहीत नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. या परवान्याची मुदत पंधरा दिवसांची असणार असून, मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
सर्व तात्पुरते परवानाधारकांनी यंदाही नव्याने अर्ज दाखल करणे बंधनकारक राहील. अर्जासोबत पोलीस अधीक्षक कार्यालयाचे चारित्र्य प्रमाणपत्र, तहसिलदार कार्यालयाचा अहवाल, स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाहकरत प्रमाणपत्र, नियोजित जागेचा अभिलेख, अर्जदाराचे आधार कार्ड व दोन पासपोर्ट फोटो जोडणे आवश्यक आहे. इमारत अथवा जागा स्वतःच्या मालकीची नसल्यास घरमालकाचे संमतीपत्रही जोडणे बंधनकारक आहे.
सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक
Explosive Rules, 2008 नुसार फटाक्यांची दुकाने अग्नीप्रतिरोधक साहित्यापासून बांधलेली, बंदिस्त व सुरक्षित असावी. दुकाने परस्परांपासून किमान 3 मीटर व संरक्षित क्षेत्रापासून 50 मीटर अंतरावर असणे गरजेचे आहे. दुकाने समोरासमोर नसावीत. परिसरात तेल, गॅस वा खुल्या दिव्यांचा वापर निषिद्ध असून फक्त भिंतीला किंवा छताला बसविलेले विद्युत दिवेच वापरता येतील. प्रत्येक दुकानाला स्वतंत्र स्विच तसेच सर्व दुकानांसाठी एक मास्टर स्विच असणे बंधनकारक आहे. तसेच दुकानाच्या 50 मीटरच्या परिसरात आतिषबाजीवर बंदी राहील आणि एका ठिकाणी जास्तीत जास्त 50 दुकानेच उभारता येतील.
अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून व नियमांचे पालन करून वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Diwali2025 #FirecrackerLicense #DistrictAdministration #SafetyFirst #ExplosiveRules2008 #FirecrackerShops #TheGadVishva














