The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : छत्तीसगड राज्यातून दोन टस्कर (प्रौढ नर) हत्ती गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले असून, सध्या पोर्ला, कुरखेडा आणि आमिर्झा परिसरात मुक्तपणे फिरत आहेत. वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे.
२०२१ मध्ये छत्तीसगडहून आलेल्या २३ हत्तींच्या कळपाची संख्या आता ३१ वर पोहोचली आहे. या कळपात नव्याने दाखल झालेल्या दोन टस्कर हत्तींच्या हालचाली अलीकडे अधिक वाढल्या असून, ते गावांच्या मुख्य रस्त्यांवरूनही जाताना दिसत आहेत. नागरिकांनी या हत्तींपासून सुरक्षित अंतर राखावे, असा इशारा कुकडकर यांनी दिला आहे.

सेल्फीचा नाद जीवावर बेतू नये
हत्तींच्या जवळ जाऊन फोटो काढणे, सेल्फी घेणे किंवा पाठलाग करणे हा प्रकार सध्या काही ठिकाणी दिसून येतो आहे. लोकांचा गैरसमज असा की आपण हत्तींपेक्षा वेगाने पळू शकतो. मात्र हे रानटी हत्ती चवताळल्यास थेट जीवघेणा हल्ला करण्याची शक्यता असते. अशाच एका घटनेत, कुनघाडा वनपरिक्षेत्रात सेल्फी घेण्याच्या नादात एका तरुणाचा मृत्यू झाला होता.
वनविभागाच्या सूचना पाळा – हत्तींच्या वाटेत जाऊ नका
अजय कुकडकर यांनी स्पष्ट सांगितले की, “हे हत्ती सध्या नवीन परिसर रेखाटत असून त्यांच्या हालचाली अनिश्चित आहेत. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या वाटेत अडथळा निर्माण करू नये. सेल्फी व व्हिडिओसाठी जीव धोक्यात घालू नका.”
हत्ती आढळल्यास तातडीने स्थानिक वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. वन्यजीव आणि मानव यांच्यातील सुरक्षित अंतर राखणे ही सध्या काळाची गरज आहे.