– प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन
The गडविश्व
ता.प्र. / कोरची – कुरखेडा, दि. ०८ : तालुक्यातील बेडगाव घाटात सध्या बिबट्याचा मुक्तपणे संचार सुरू असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घाट परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि प्रवासी यांच्यात भीतीचं सावट पसरले आहे. रात्रौ वेळेस घाटातून प्रवास करणं अधिकच धोकादायक ठरत असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास बेडगाव घाटात बिबट्याचे दर्शन झालं. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावरही व्हायरल झाल्याचे कळते. या आधीही या भागात वारंवार बिबट्याचे हालचाली पाहायला मिळाल्या असून, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी याबाबत प्रशासनाला सतर्क केलं आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार, बिबट्या, अस्वल, कोल्हा, तरस यांसारख्या वन्यप्राण्यांचा या परिसरात नैसर्गिक अधिवास आहे. घाटाची एकूण लांबी १० किलोमीटर असून, त्यातील २ ते १० किलोमीटरचा भाग वन्यप्राण्यांच्या संचारासाठी संवेदनशील मानला जातो.
या मार्गावरुन नियमित प्रवास करणारे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ यांनी प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी. विशेषतः रात्री व एकट्याने प्रवास टाळावा, लहान मुलांना एकटे सोडू नये, अशी विनंती प्रशासन आणि वनविभागाने केली आहे.
बिबट्याचे वाढते दर्शन आणि हलचाली पाहता या परिसरात वनविभागाने गस्त वाढवावी, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ राबवाव्यात, अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.

(#thegdv(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gondwana_university #kurkheda)