– जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्टला गडचिरोलीत मॅरेथॉन स्पर्धा
The गडविश्व
गडचिरोली, दि.०३ : “आदिवासी समाज आजही भरकटलेल्या दिशेने वाटचाल करतो आहे. केवळ उत्सव साजरे करून समाजाचा विकास शक्य नाही. आदिवासी समाजाला योग्य दिशा देण्यासाठी ‘कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य आणि स्व-जागृती’ ही पंचपरिवर्तन सूत्रे स्वीकारली पाहिजेत,” असे प्रतिपादन माजी आमदार तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी केले.
स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गडचिरोली शहरात सकाळी ९ वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
डॉ. होळी म्हणाले की, संयुक्त राष्ट्रसंघाने २३ डिसेंबर १९९४ रोजी घेतलेल्या ४९/२१४ या ठरावानुसार ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित करण्यात आला असून जगभरातील आदिवासी समुदायात हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. मात्र केवळ उत्सव न साजरे करता समाजात ठोस परिवर्तन घडवणे गरजेचे आहे. आदिवासी समाजामध्ये आजही अज्ञान, अंधश्रद्धा, वाईट प्रथा आणि अंधानुकरण मोठ्या प्रमाणावर आढळते. यामुळे समाज दिशाहीन झाला असून, अनेक कुप्रथांना बळी पडत आहे. समाजात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी विचारवंत, इतिहासकार, लेखक आणि सामाजिक नेतृत्व यांना पुढे येऊन नव्याने विचार मांडणे आवश्यक आहे.
डॉ. होळी यांनी सांगितले की, पंचपरिवर्तन ही संकल्पना आदिवासी समाजासाठी नवीन नाही. आपल्या चिरंतन संस्कृतीतील रुढी, परंपरा आणि चांगल्या चालीरीती याच सूत्रांवर आधारलेले होत्या. मात्र आज त्या विस्मरणात गेल्या असून, त्यांची जागा वाईट प्रथांनी घेतली आहे. त्यामुळे समाजात नव्याने जागृती घडवणे गरजेचे आहे. कुटुंब प्रबोधनातून सशक्त आणि शाश्वत कुटुंबव्यवस्था निर्माण करता येईल. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून वैयक्तिक व सामाजिक स्तरावर त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सामाजिक समरसता राखून भेदभाव संपवणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने नागरी कर्तव्यांची जाणीव ठेवून सामाजिक व नैतिक मूल्यांचा स्वीकार करावा. तसेच स्व-भाषा, स्व-संस्कृती, स्व-परंपरा आणि स्वदेश याबद्दल अभिमान ठेवत स्वतःच्या ओळखीची जाणीव प्रत्येकाने बाळगणे गरजेचे आहे. हीच पंचसूत्रे अंगिकारल्यास आदिवासी समाज नव्या विकासाच्या मार्गावर प्रवास करू शकेल.
या पत्रकार परिषदेला परिषदच्या महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, जिल्हा उपाध्यक्ष वामन जुनघरे, उमेश उईके, सूरज मडावी, मालता पुडो, विद्या दुग्गा, मुकुंदा मेश्राम, येरमे, देवेंद्र राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #press #JagtikAdivasiDin #PanchParivartan #AdivasiVikas #GadchiroliNews #DrDeoraoHoli #AdivasiJagran #Marathon2025 #AdivasiSamaj #SocialAwakening #AdivasiYouth #जागतिक_आदिवासी_दिन #पंचपरिवर्तन #आदिवासी_विकास #गडचिरोली_बातमी #डॉ_देवराव_होळी #आदिवासी_जागर #मॅरेथॉन_२०२५ #आदिवासी_समाज #सामाजिक_प्रबोधन #युवा_जागृती
