उराडी येथे युवक–युवतींसाठी प्रथमोपचार, नेत्ररोग व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
– संकल्प फाउंडेशन व युवक कल्याण विभागाचा स्तुत्य उपक्रम
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १४ : ग्रामीण भागातील युवक–युवतींमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने संकल्प फाउंडेशन, गेवर्धा आणि युवक कल्याण कार्यक्रम, जिल्हा क्रीडा विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने कुरखेडा तालुक्यातील उराडी येथील कुथे पाटील विद्यालयात पाच दिवसीय प्रथमोपचार, नेत्ररोग व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले.
शिबिराचे उद्घाटन नेत्र चिकित्सक डॉ. आनंद तागवान यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दादाजी पुस्तोडे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बोरकर, डॉ. प्राजक्ता दुपारे, प्रा. दिनेश झोडे, प्रा. खुशाल जनबंधू, प्रा. दिलीप फुलबांधे, औषध निर्माण अधिकारी धम्मप्रिया झाडे, परिचारिका टिकेश्वरी करमकार तसेच अनिल तलमले, देवनाथ सोनुले, मनोहर शहारे, हिरादास मार्गाये आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. जगदीश बोरकर यांनी युवकांना प्रथमोपचाराचे महत्त्व, व्यसनमुक्त जीवनशैली, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायामाचे आरोग्यदायी फायदे सांगत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांना शिक्षणाबरोबरच समाजसेवेसाठी व राष्ट्रनिर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
डॉ. प्राजक्ता दुपारे यांनी युवतींना मासिक पाळी दरम्यान उद्भवणाऱ्या समस्या, आरोग्य व्यवस्थापन आणि योग्य स्वच्छतेबाबत माहिती दिली. तर डॉ. आनंद तागवान यांनी मोबाईल आणि संगणकाचा अतिरेक वापरामुळे डोळ्यांवर होणारे परिणाम, त्यावरील उपाय आणि डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
या शिबिरादरम्यान युवक–युवतींची नेत्र तपासणी, संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्वांना मोफत औषधोपचारही देण्यात आले. तसेच “मेरी माटी, मेरा देश” या उपक्रमांतर्गत राष्ट्रनिष्ठेची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राहुल पाटणकर यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी गोविंद बोरकर आणि फलींद्र मांडवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews














