एटापल्लीमध्ये ‘फार्मर कप 2026’साठी शेतकरी प्रशिक्षण
– पाणी फाउंडेशन व कृषी विभागाची संयुक्त पुढाकार
The गडविश्व
एटापल्ली, दि. २६ : तालुक्यात आज पाणी फाउंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत राज्यस्तरावर होणाऱ्या ‘फार्मर कप 2026’ या महत्त्वाकांक्षी स्पर्धेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी अरुण वसवाडे, मंडळ कृषी अधिकारी एच. के. राऊत, तसेच कृषी विभागातील उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषि अधिकारी उपस्थित होते. पाणी फाउंडेशनचे रीजनल समन्वयक अभिजीत गोडसे, दविदास कडते आणि अक्षय आतला यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत स्पर्धेची रचना, उद्दिष्टे आणि प्रशिक्षण पद्धतींची माहिती दिली.
मार्गदर्शन सत्रात पाणी फाउंडेशनच्या कार्याचा परिचय, फार्मर कप स्पर्धेचा उद्देश, निवासी प्रशिक्षणांची प्रक्रिया यावर प्रकाश टाकण्यात आला. शेतकऱ्यांचा खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
‘फार्मर कप 2026’ ही राज्यातील 351 ग्रामीण तालुक्यांमध्ये राबविण्यात येणारी मोठी स्पर्धा असून, तिची अंमलबजावणी कृषी विभाग मोठ्या प्रमाणावर करणार आहे. खरीप हंगामावर आधारित या स्पर्धेत 36 विविध पिकांचा समावेश राहणार असून, गटशेतीच्या माध्यमातून ग्रामीण भाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे या योजनेचे वैशिष्ट्य असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर शेतकऱ्यांना ‘महाकृषी ॲप’ चे महत्त्व, ॲप डाउनलोड प्रक्रिया, नोंदणी व त्याचा वापर कसा करावा याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन देण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला ऐटापल्ली तालुक्यातील विविध गावांमधील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कृषी विभागाने काटेकोरपणे केले होते.














