भांडवलदारांच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावल्या जाणार – संघर्षासाठी सज्ज राहा
– भाई रामदास जराते यांचे शेतकऱ्यांना थेट आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : जिल्ह्यात भांडवलदारांचे हित साधणारा तथाकथित विकास लादला जात असून, या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी हिरावून घेण्याचा डाव आखला जात आहे. नेत्यांच्या मागे धावून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. आपली जमीन, हक्क आणि अस्तित्व वाचवायचे असतील तर शेतकऱ्यांनी स्वतःच संघर्षासाठी सज्ज राहावे, असे परखड आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.
ते तालुक्यातील मुडझा येथे महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिराच्या मदतनिधीसाठी आयोजित नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत, रोजगार हमी योजनेच्या कायद्यात दुरुस्तीच्या नावाखाली गरिबांच्या हातातील रोजगार हिरावून घेण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप केला. ग्रामीण व शेतकरी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघटित लढ्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या नाटकाचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते व ढिवर समाज संघटनेचे जिल्हा सचिव किशोर बावणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मुडझाचे सरपंच शशिकांत कोवे, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, शेकापचे खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा समिती सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, भटक्या-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, तुलाराम राऊत, तंमुस अध्यक्ष श्रीहरी चौधरी, उपसरपंच शोभाताई जेंगठे, ग्रामपंचायत सदस्य विवेक बारसिंगे, संजय चौधरी, गौरव सोनूले, राजू चौधरी, किशोर ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे उपाध्यक्ष लक्ष्मण शेंडे, सचिव खुशाल मेश्राम यांच्यासह बाळू शेंडे, रविंद्र शेंडे, प्रभाकर भोयर, विठ्ठल मेश्राम, पंकज शेरकी, पद्माकर कांबळे, विजय शेंडे, किरण भोयर, उमाजी शेंडे, विलास शेरकी, कृष्णा भोयर, कृष्णा शेंडे, लखन शेरकी, अजय भोयर, विठ्ठल भोयर तसेच शिक्षक बोरीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














