शासनाच्या दिरंगाईमुळे शेतकरी अडचणीत : धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०८ : गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत किमतीत धानाची खरेदी केली जाते. यावर्षी शासनाने खरेदी केंद्रांना परवानगी दिली असली तरी डिसेंबर महिना अर्धा उलटूनही एकही केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. कापणी आणि मळणी पूर्ण झाल्यानंतर घरात धान साठविण्याची सुविधा नसल्यामुळे बळीराजांना आपले धान कवडीमोल भावाने खाजगी व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ आली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे दुबार पेरणी, कीड प्रादुर्भाव, तसेच अवकाळी पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यात जंगली हत्तींच्या हल्ल्यांनी शेकडो शेतकऱ्यांचे हातात आलेले पिक पायदळी तुडवले. परिणामी, भीतीपोटी शेतकऱ्यांनी लवकर कापणी केली. मात्र खरेदी केंद्रच सुरू झाले नसल्याने धान विकायचे कुठे हा प्रश्न आज प्रत्येक बळीराजासमोर उभा आहे. गावागावात परवाना नसलेल्या व्यापाऱ्यांकडून धानाची खरेदी सुरू असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असल्याचे चित्र दिसून येते. धानाला कमी भाव मिळत असल्याने सावकारी कर्ज, घरखर्च आणि इतर गरजा पूर्ण करण्यास शेतकऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत आहे.
शासनाने खरेदी केंद्रांना हिरवा कंदील दाखवला असला तरी प्रत्यक्षात केंद्र सुरू झाले नसल्याने गोदामातील धानाचा साठा तसाच राहिला आहे. खरेदी केंद्रावर साठवलेले धान वेळेवर उचल न झाल्यामुळे पुढील खरेदीही बंद पडली आहे. शेतकऱ्यांवर अडचणींचे ढग दाटले असून जिल्ह्यातील सर्व खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी वेगाने जोर धरत आहे.
रांगी येथील शेतकरी नरेंद्र भुरसे यांनी सांगितले की, “बळीराजांनी पिकविलेले धान साठवून ठेवणे ही आता आवाक्याबाहेरची गोष्ट झाली आहे. शासनाने तातडीने खरेदी केंद्र सुरू करावे.” तर आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था रांगीचे अध्यक्ष जगदीश कन्नाके यांनी मागणी केली की, “खरेदी केंद्रावर जमा झालेले धान्याची वेळेवर उचल करून गोदाम खरेदीसाठी खुले करावेत.”
जगाचा पोशिंदा मानला जाणारा बळीराजा आज स्वतःच्या पिकासाठी बाजारपेठ शोधत फिरत आहे. खरेदी केंद्र सुरू करण्यात झालेल्या दिरंगाईमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तातडीने पुढाकार घेऊन आधारभूत किमतीत धान खरेदी प्रक्रिया सुरू करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.














