The गडविश्व
गडचिरोली, दि.०१ : जिल्ह्यात रानटी हत्तींमुळे शेतपिकांचे सातत्याने नुकसान होत असताना, पोर्ला येथील शेतकरी गजानन डोंगरवार यांच्या शेतीवर नुकताच हत्तींचा हल्ला झाला. मात्र, वन विभागाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने डोंगरवार यांनी थेट सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
शेतकऱ्याची ही तातडीची तक्रार लक्षात घेत सहपालकमंत्र्यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर अवघ्या एका तासात वन विभागाने नुकसान भरपाई मंजूर करत मदतीचे आदेश जारी केले. ही तत्काळ कार्यवाही संथ प्रशासन यंत्रणेसमोर एक सकारात्मक उदाहरण ठरली.
आज श्री. डोंगरवार यांनी गडचिरोली विश्रामगृहात सहपालकमंत्र्यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना ॲड. जयस्वाल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “वन विभागाने प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बाबतीत संवेदनशीलता दाखवावी आणि मदतीत कोणतीही चालढकल होऊ देऊ नये.”
या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचल्यास तात्काळ न्याय मिळू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews
