कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा : माजी आमदार गजबे

7

– शिवराजपुरमध्ये कामगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, दि. २१ : कामगार कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक गरजू बांधकाम कामगारापर्यंत पोहोचवणे हीच खरी लोकसेवा आहे, असे मत माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुशासनाच्या 11 वर्षांच्या संकल्पपूर्ती निमित्त ग्रामपंचायत शिवराजपुर येथील सभागृहात भारतीय जनता पार्टी तालुका देसाईगंज ग्रामीणच्यावतीने इमारत बांधकाम कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याचे उद्घाटन कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती रोशनी पारधी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी माणिक बनसोड, माजी उपसरपंच वासुदेव झिल्पे, ग्रामपंचायत सदस्य तसेच कल्पतरू असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादे यांची उपस्थिती होती.
यावेळी गजबे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत, त्या योजनांचा लाभ अंतिम घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सजग राहावे असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात रोशनी पारधी यांनी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, कामगार नोंदणी आणि सामाजिक सुरक्षा योजनेबाबत माहिती दिली.
या मेळाव्यास शिवराजपुर व परिसरातील सुमारे 150 ते 200 नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष सुनील पारधी, प्रमोद झिल्पे, आदित्य मिसार, विकास पारधी, सुनील राऊत, मंजुषा मेश्राम, प्रमोद बेद्रे आणि भूमेश्वर पारधी (कोंडाळा) यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here